मुसळधार पाऊस... अहो भुरभुरही नाही! 

संजय जगताप
मंगळवार, 18 जुलै 2017

मायणी  - हवामान विभागाचे अधिकारी मुसळधार पावसाचा अंदाज वारंवार सांगत आहेत. सातारा, सांगलीत संततधार म्हटले जातेय. पण, खटाव, माणसह दुष्काळी पट्ट्यातील गावे अद्याप तहानलेली आहेत. ऐन पावसाळ्यातही टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. आषाढ निम्मा संपला तरी पावसाने दडी मारलीय. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे. 

मायणी  - हवामान विभागाचे अधिकारी मुसळधार पावसाचा अंदाज वारंवार सांगत आहेत. सातारा, सांगलीत संततधार म्हटले जातेय. पण, खटाव, माणसह दुष्काळी पट्ट्यातील गावे अद्याप तहानलेली आहेत. ऐन पावसाळ्यातही टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. आषाढ निम्मा संपला तरी पावसाने दडी मारलीय. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे. 

हवामान विभागाकडून वारंवार मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, दुष्काळी पट्ट्यात अद्याप मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. उन्हाळी पाऊसही परेसा झालेला नाही. अपवाद वगळता मॉन्सूनपूर्व पावसानेही दुष्काळी भागाकडे पाठ फिरवली. मॉन्सूनच्या पावसाने सुरवातीलाच दोन दिवस हजेरी लावली. त्या ओलीवरच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. त्यानंतर पावसाने दडी मारली. केव्हा तरी एखादी पावसाची हलकी सर येते. त्यामध्ये पिकाच्या कोवळ्या मोडांची आंघोळही होत नसल्याचे चित्र आहे. दमदार पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. ठिकठिकाणी माळरानांवर केलेली पेरणी वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. कदाचित दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. दुबार पेरणी करूनही उपयोग होणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. खरिपाचा हंगामच वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाकडून वारंवार मुसळधार पावसाची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आमच्याकडे साधी भुरभुरही नाही. त्याबाबत तरुण शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. 

दुष्काळी पट्ट्यातील गावोगावी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत खूप कामे झाली आहेत. नालाबांध, बंधारे, समतल चर (सीसीटी) याद्वारे पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याची तयारी लोकांनी केली आहे. पण, पावसाचाच पत्ता नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही पाणीटंचाई दिसत आहे. लोकांची पाण्यासाठीची धावाधाव अद्याप कमी झालेली नाही. शासन दरबारी 30 जूनपर्यंतच टंचाई काळ मानला जातो. त्यानंतर एक जुलैपासून टॅंकरने पाणीपुरवठा बंद करण्यात येतो. मात्र, अद्यापही मायणीसह परिसरातील नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाऊस नाही, पाणी नाही, सरकारची दहा हजारांची मदत नाही, कर्जमाफी नाही. सर्व बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.