दिल्लीवरची चढाई अजून संपलेली नाही!

दिल्लीवरची चढाई अजून संपलेली नाही!

सातारा - सांप्रदायिकतेविरुद्ध बहुजनवादी विचारसरणीच्या लोकांची संघटना बांधण्याचे सूतोवाच करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आगामी काळातील त्यांच्या राजकारणाची दिशा काय असणार, हे जाणवून दिले. दिल्लीवरची चढाई अजूनही संपलेली नाही, हेच त्यांच्या कालच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. साताऱ्याच्या मातीचे बळ घेऊन तिसऱ्या आघाडीचा पर्याय निर्माण करण्याच्या कामाला ते लागणार हे नक्की.

शरद पवार हे देशाच्या राजकारणातील अजब रसायन हे सर्वजणच मान्य करतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात अर्थ दडलेला असतो. संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काल जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शरद पवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, काल त्यांनी अत्यंत मोजक्‍या शब्दांत भाषण केले. साताऱ्याच्या मातीचे गुण काय आहेत, हा त्यांच्या भाषणाच्या पूर्वार्ध होता. सर्वांना सोबत घेऊन जाणारे यशवंत विचार, कोणत्याही प्रकारच्या संघर्षाची तयारी आणि बलाढ्य शक्तींना नामोहरम करण्यापर्यंत लढा देण्याची वृत्ती या गुणांचे वर्णन त्यांनी केले. मुघली सत्तेविरुद्धचा लढा असो किंवा ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा. प्रत्येक वेळी साताऱ्याचा आदर्श घेऊन त्यातून संपूर्ण देशभर परिवर्तनाची लाट उसळली, परिवर्तने झाली, याची आठवणही त्यांनी करून दिली. या मातीचाच अंश असल्याने ते गुण माझ्यातही उतरल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

भाषणाच्या मध्यात त्यांनी सध्याच्या विदारक परिस्थितीचे वर्णन केले. ब्रिटिश व मुघल साम्राज्यात सर्वसामान्यांच्या होणाऱ्या पिळवणुकीशी तो धागा त्यांनी जोडला. उत्तरार्धात त्यांनी सांप्रदायिक शक्तींविरोधात बहुजन विचारसरणीच्या सर्वांची संघटना उभी करण्याची गरज व्यक्त केली.

देशाची सध्याची परिस्थिती पाहता शासनकर्त्यांच्या विविध धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असल्याचे चित्र आहे. देशाच्या विविध भागांत उमटणारे जातीयवादी हुंकार ऐकून सर्वसामान्यांच्या हृदयाचा ठोका चुकतो आहे. जाती-जातीमध्ये अस्वस्थता आहे. एका जातीला दुसऱ्या जातीबद्दल अकारण भीती वाटत असल्याची परिस्थिती आहे. विरोधी व्यक्तींना सत्तेचा पुरेपूर वापर करत दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून शासनकर्त्यांविरुद्ध जनतेचा रोष वाढत असल्याची वस्तुस्थिती आहे. ही परिस्थिती गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांनाही अनुभवायला मिळत आहे. त्याची जाणीव झाल्याने सत्ताधारी पक्षाकडूनही उपाययोजना सुरू आहे. धोरणातील बदल असतील किंवा विरोधी पक्षाशी जुळवून घेण्याचे प्रयत्न. यातील पुढील निवडणुकांमध्ये मित्रांची संख्या वाढवावी लागणार याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाल्याचेच स्पष्ट करते.

सत्ताधाऱ्यांना होणारी ही जाणीव राजकारणातील पितामह समजल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या नजरेतून नक्कीच सुटणार नाही. त्याचीच प्रचिती त्यांनी कालच्या भाषणात दिली. भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या मागील निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या असल्या, तरी मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नाही. शासनाची धोरणे व जातीयवादी विचारांना खतपाणी घालणाऱ्या सत्ताधारी नेत्यांच्या कृतीमुळे तो कमी-कमी होत चालला आहे. त्याचा फायदा घ्यायचा असेल, तर पुरोगामी, बहुजनवादी विचारसरणीच्या सर्वांना सर्व मतभेद बाजूला सारून समान उद्देशासाठी एकत्र यावेच लागणार आहे आणि देशातील सर्वांची मोट बांधण्याचे कसब शरद पवार यांच्यात नक्कीच आहे. त्यामुळे आगामी काळात समविचारी पक्षांच्या तिसऱ्या आघाडीचा प्रयोग अस्तित्वात येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com