नाराजी रोखण्यासाठी राजकीय डावपेच 

नाराजी रोखण्यासाठी राजकीय डावपेच 

सातारा - जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी काल (ता. 6) तब्बल 760 अर्ज दाखल झाल्याने राजकीय पक्षांपुढे बंडोबांना शांत करण्याचे आव्हान आहे. इच्छुक असतानाही पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी सवतासुभा मांडण्याची भूमिका घेतली आहे. त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी व कॉंग्रेसला बसला आहे. त्यामुळे नाराजांची बंडाळी रोखण्यासाठी नेते मंडळींनी राजकीय डावपेच आखण्यास सुरवात केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या 64 जागांसाठी 760, तर 11 पंचायत समित्यांच्या 128 जागांसाठी एक हजार 322 अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप व शिवसेनेने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. इच्छुकांना अर्ज दाखल करण्यास सांगितल्याने अनेकांनी पक्ष किंवा आघाडी व अपक्ष असे दोन्ही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. उमेदवार हमखास मिळणार, अशा अविर्भावात असणाऱ्या इच्छुकांचा ऐनवेळी नेतेमंडळींनी पत्ता "कट' केल्याने त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. त्याचा परिणाम थेट पक्षाच्या उमेदवारावर होणार असल्याने या बंडखोरीला महत्त्व आले आहे. अनेकांनी रुसवा, फुगवा घेत पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्याचाही निर्णय घेतला आहे. 

ल्हासुर्णे गटातून जयवंत भोसले यांना उमेदवारी दिल्याने "राष्ट्रवादी युवक'चे जिल्हाध्यक्ष ऍड. नितीन भोसले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव यांनीही तोच पवित्रा घेतल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय पुसेगावचे सतीश फडतरे, त्यांच्या पत्नी महिला व बालकल्याण सभापती वैशाली फडतरे गटाने भाजपची वाटही धरली आहे. त्याच पद्धतीने उमेदवारी डावलल्याने अनेकांकडून भाजपचे दार ठोठावले जात आहे. त्यामुळे नाराजी दूर करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे मोठे आव्हान आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीतून शेंद्रे गटात सुनील काटकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या विरोधात खासदार गटातीलच माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ यांनी एल्गार केला आहे. खंडाळ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश धायगुडे, संजय पाटील, कॉंग्रेसमधून अजय धायगुडे, बापूराव धायगुडे, भादे गटातून राष्ट्रवादीच्या सुनीता धायगुडे, उज्ज्वला पवार, शिवसेनेच्या रोहिणी साळुंखे, शिरवळ गटातून उदय कुबले आदी बंडखोरीच्या तयारीत आहेत. 

काहींनी "फायद्या'साठी अर्ज दाखल केले असून, त्यासाठी अडूनही बसलेले दिसतात. या इच्छुकांची मनधरणी करण्याचे तसेच अपक्षांमुळे होणारी मतविभागणी टाळण्यासाठी दबावाचे राजकारणही सुरू झाले आहे. 

राष्ट्रवादीसाठी "पाडापाडी' घातक 
उमेदवारी न दिल्यास नाराज कार्यकर्ते पक्षनिष्ठेने काम करतीलच, याबाबत शंका असल्याने राष्ट्रवादीसाठी अडचणीचे ठरणार आहे. कदाचित उमेदवारीत डावलले गेल्याने पाडापाडीचे राजकारणही होऊ शकते. अजित पवार यांनीही राष्ट्रवादीच्या येथील मेळाव्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाडण्याची ताकद फक्‍त राष्ट्रवादीतच असल्याचे सांगून पाडापाडीचे राजकारण करू नका, असा सल्ला दिला होता. या निवडणुकीतही इच्छुकांना डावलले गेल्याने तीच भीती राष्ट्रवादीत दिसून येत आहे. 

गटांसाठीचे 42, तर गणांतील 42 अर्ज अवैध 
जिल्हा परिषदेसाठी दहा उमेदवारांचे 19 अर्ज अवैध ठरले. त्यामध्ये तालुकानिहाय अर्जांची संख्या : सातारा- दोन, कोरेगाव- एक, पाटण- दोन, वाई- सहा, माण- आठ. पंचायत समितीसाठी एकूण 22 उमेदवारांचे 42 अर्ज अवैध ठरले. तालुकानिहाय अवैध ठरलेले अर्ज : सातारा- नऊ, जावळी- एक, कऱ्हाड- एक, पाटण- दोन, वाई- दहा, फलटण- एक, माण- 18.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com