कर्जमाफी नको; नंतर लोकांच्या आशा वाढतात- भट्टाचार्य

टीम ई सकाळ
बुधवार, 15 मार्च 2017

आता कर्जांचा परतावा मिळेल, कारण सरकार त्याचे पैसे भरेल. परंतु कर्जांचे वितरण करू तेव्हा शेतकरी पुन्हा कर्जमाफी मिळण्यासाठी पुढील निवडणुकांची वाट पाहत राहतील. त्यामुळे भविष्यातील कर्जांचीही परतफेड होणार नाही.

- अरुंधती भट्टाचार्य

मुंबई : 'अशा कर्जमाफीमुळे पत व्यवस्थेची शिस्त बिघडते, आणि भविष्यात आणखी कर्जमाफीच्या आशा वाढतात,' असे सांगत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविरोधात मत व्यक्त केले आहे. 

सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन भाजपने उत्तर प्रदेशात दिले होते. त्यावर तिथे भाजपला अभूतपूर्व विजय मिळाला असून, आता ते कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. सराकरकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीच्या आश्वासनाला भट्टाचार्य यांनी विरोध केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका अडचणीत येतात तेव्हा त्यांना सरकारी मदतीची अपेक्षा असते. परंतु, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही सरकारी मदतीची अपेक्षा ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले. 

भारतीय उद्योग संघाने (CII) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमावेळी माध्यमांशी बोलताना अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, "अद्याप कर्जमाफीबद्दल सरकारकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला असे वाटते की, कर्जमाफीमुळे पतव्यवस्था विस्कळीत होते. आणि नंतर लोकांना आणखी कर्जमाफी मिळण्याची आशा निर्माण होते."

"आता कर्जांचा परतावा मिळेल, कारण सरकार त्याचे पैसे भरेल. परंतु कर्जांचे वितरण करू तेव्हा शेतकरी पुन्हा कर्जमाफी मिळण्यासाठी पुढील निवडणुकांची वाट पाहत राहतील. त्यामुळे भविष्यातील कर्जांचीही परतफेड होणार नाही," असे त्यांनी सांगितले.