भंगारातील एसटीचे मालमोटारीत "परिवर्तन' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

आयुर्मान संपलेल्या, भंगारात निघालेल्या परिवर्तन बसचे मालमोटारीमध्ये रूपांतर केले जाईल. या बसचा मालवाहतुकीसाठी वापर होईल. त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. एसटी महामंडळाला होत असलेल्या तोट्याच्या पार्श्‍वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री

मुंबई - भंगारात काढलेल्या अनेक "परिवर्तन' बसचा मालवाहतुकीसाठी वापर करण्याचा निर्णय राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी या बसचे मालमोटारीमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. 

महामंडळाच्या ताफ्यात 18 हजार 600 बस आहेत. त्यापैकी सुमारे 14 हजार "परिवर्तन' बस आहेत. दरवर्षी आयुर्मान संपलेल्या सुमारे तीन हजार बस भंगारात काढण्यात येतात. तेवढ्याच नवीन बस ताफ्यात आणल्या जातात. दीड हजार बसची पुनर्बांधणी केली जाते, तर दीड हजार बस बाहेरून विकत घेतल्या जातात. आयुर्मान संपलेल्या बसमध्ये "परिवर्तन'बसची संख्या मोठी असते. या बसचे मालमोटारीमध्ये रूपांतर करून त्यांचा मालवाहतुकीसाठी वापर केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकेल, अशी महामंडळाला आशा आहे. एसटी महामंडळाची स्वतंत्र मालवाहतूक व्यवस्था नाही, त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसमधून मालवाहतूक केली जाते. मालवाहतुकीतून दर तीन वर्षांत महामंडळाला 20 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. या पार्श्‍वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सहाशे कोटींची बचत होणार 
एसटी महामंडळाने पोलादाचा वापर करून बस बांधण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिली बस बांधून तयार आहे. एसटीच्या बांधणीसाठी महामंडळाला गाडीमागे 32 लाख रुपये खर्च येतो. प्रत्यक्ष बांधणीचा खर्च 20 लाख, तर सांगाडा विकत घेण्याचा खर्च 12 लाख असतो; मात्र पोलादाचा वापर करून बांधलेल्या बससाठी केवळ 12 लाख रुपये खर्च आला. आपल्याच कारखान्यातील बसचा सांगाडा वापरून महामंडळाने ही बस बांधली, त्यामुळे महामंडळाचे 20 लाख रुपये वाचले. ही बचत पाहता महामंडळाने तीन हजार बस स्वतःच बांधण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे महामंडळाची सहाशे कोटी रुपयांची बचत होईल. 

टॅग्स