शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना अटकपूर्व जामीन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

ठाणे - भिवंडीतील व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांना शनिवारी (ता. 20) अखेर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. प्रत्येकी एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर त्यांना जामीन देण्यात आला.

न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहराबाहेर न जाण्याचे आदेशही न्यायालयाने शिल्पा आणि राज यांना दिले आहेत. दरम्यान, शनिवारी न्यायालयाच्या परिसरातच राज याने तक्रारदार रवी भालोटिया यांना धमकी दिल्याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापारी रवी मोहनलाल भालोटिया यांच्या भालोटिया एक्‍स्पोर्ट कंपनीला ऑनलाइन विक्री केलेल्या मालाचे 24 लाख न दिल्याने शिल्पा आणि राज यांच्यासह कंपनीच्या पाच संचालकांवर काही दिवसांपूर्वी कोनगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी शिल्पा आणि राज यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात शुक्रवारी (ता. 19) हजेरी लावली होती. न्या. संगीता खलिपे यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. शनिवारी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला.

दरम्यान, राज याने सुनावणी संपल्यानंतर तक्रारदार भालोटिया यांना बदनामीच्या खटल्यापोटी 100 कोटी तयार ठेव, असे धमकावले. भालोटिया यांच्या वकिलांनी न्यायाधीशांसमोर ही बाब स्पष्ट केल्यानंतर याप्रकरणी कुंद्रा यांच्या वकिलांनी माफी मागितली होती. शनिवारी भालोटिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.