राज्यातील बारा जिल्ह्यांवर दुबार पेरणीचे संकट - विखे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

सरकारने मोफत बियाणे, खते व वित्तपुरवठा करावा

सरकारने मोफत बियाणे, खते व वित्तपुरवठा करावा
शिर्डी - पावसाने डोळे वटारल्यामुळे राज्यातील बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने बियाणे, खते मोफत द्यावे, तसेच वित्तपुरवठा करण्याची तयारी सुरू करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

विखे पाटील म्हणाले, 'दोन दिवसांत पाऊस पडला नाही, तर बारा जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीची वेळ येईल. राज्याच्या कृषिमंत्र्यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. सरकारने या संकटाला तोंड देण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू करावी. शेतमालाला भाव नसल्याने गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. थकबाकीत गेल्याने त्याला बॅंकांची दारे केव्हाच बंद झाली. अशा विपरीत परिस्थितीत शेतकऱ्यांनी उधार-उसनवार करून, तर काहींनी मिळेल त्या मार्गाने कर्ज काढून यंदा खरिपाची पेरणी केली. दुबार पेरणीचा खर्च करण्याची त्यांची ताकद राहिलेली नाही. आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना हे संकट पेलवणार नाही.''

'अशा गंभीर परिस्थितीच्या काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करावी. आपण कृषिमंत्री असताना अशा संकटकाळात शेतकऱ्यांना बांधावर रासायनिक खते व बियाणे मोफत दिली होती. वित्तपुरवठ्याची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता शेतकरी पुन्हा एकदा त्याच संकटात सापडला आहे. यंदा पंधरा जुलैपर्यंत निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना बॅंकांचा कर्जपुरवठा झालेला नाही. दहा हजार रुपयांचे पेरणी अनुदानही मिळालेले नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पुढे यावे,'' अशी मागणी विखे पाटील यांनी केली.