खासदार म्हणजे कचरा, तुम्ही तेवढे ‘शाणे’?- सेनेचा एअर इंडियाला सवाल

टीम ई सकाळ
मंगळवार, 11 एप्रिल 2017

वर्तन सुधारण्याची सुरवात स्वतःपासून करावी. गायकवाड चुकले असतील तर कायदा त्यांना शिक्षा करील, पण दोन-पाच लोकांची मनमानी म्हणजे कायद्याचे राज्य नसून ती अराजकाची सुरुवात आहे, असे 'सामना'ने म्हटले आहे. 

मुंबई : लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार म्हणजे कचरा व आम्ही तेवढे ‘शाणे’ या स्वप्नरंजनातून नोकरशाही बाहेर पडेल तेवढे बरे, असे सांगत एअर इंडियाच्या शिस्तीची व्याख्या काय, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या वर्तनाचे समर्थन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आले आहे. शिवसेनेने म्हटले आहे की, "नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा हे एक सज्जन गृहस्थ आहेत. त्यांच्या शिस्त पर्वाचे आम्ही स्वागत करीत आहोत, पण लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी करणे हे एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी व्यवस्थापकांचे वर्तन शिस्तीच्या कोणत्या चौकटीत बसते? एअर इंडियाच्या शिस्तीची व्याख्या काय? याबाबत संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन सांगितलेत तर बरे होईल!"

विमानखात्याच्या राज्यमंत्र्यांनी आता असे बजावले आहे की, विमानांत बेलगाम वर्तन केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री सिन्हा यांच्या इशाऱ्याचे आम्ही स्वागत करीत आहोत. बेशिस्त लोकांना शिस्त लावल्याशिवाय देशाचा गाडा रुळावर येणार नाही व त्यासाठी अनेकदा हाती ‘हंटर’ घेऊनच बसावे लागते, पण शिस्तीच्या बाबतीत एअर इंडियास प्रा. रवींद्र गायकवाड प्रकरणानंतर जाग आली आहे, असे सांगत त्याचे श्रेयही सेनेने गायकवाड यांना दिले आहे. 

काय म्हटले आहे 'सामना'त?

  • गायकवाड प्रकरणात नेमके काय घडले याची रेकॉर्ड वाजवण्यात अर्थ नाही.
  • काश्मीर खोऱ्यातील पाकिस्तानी दहशतवादापेक्षा या प्रकरणास अधिक प्रसिद्धी देऊन माध्यमांनी जो तडका लावला तो आश्चर्यकारक.
  • एखाद्या राज्यात शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास ते राज्य बरखास्त केले जाईल असा इशारा आतापर्यंत दिल्लीश्वरांनी का देऊ नये?
  • विमानात बेलगाम वर्तन केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील हे बरोबरच. मग फक्त विमानातच कशाला, जमिनीवर का नाही?
  • चप्पल मारणारा दोषी आहे, पण ज्याचे थोबाड त्या चपलेने फुटले तो तरी खरोखरच संत सज्जन आहे काय याचीही शहानिशा होऊ द्या. 
  • विजयवाडा विमानतळावर तेलुगू देसमच्या खासदाराने डय़ुटी मॅनेजरच्या थोबाडात मारून विमानाचे उड्डाण रोखले. मग हा गायकवाडी बंदी प्रयोग या खासदारांवर का झाला नाही?
  • ज्या एअर इंडिया व्यवस्थापकीय संचालकांच्या कर्तृत्वाचे पवाडे आता भाट मंडळींकडून गायले जात आहेत त्यांनी तरी या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
  • कपिल शर्माचा बेवडेबाज धिंगाणा सहन करतात आणि काल-परवा एका तृणमूल खासदाराने केलेले बेशिस्त वर्तनही गिळून टाकतात. गायकवाड प्रकरणात त्यांचे कर्तव्यदक्ष मन उसळ्या मारते व त्यांचे भाट सोशल मीडियावर जणू यासम हाच असा आव आणून 'बच्चे लोग ताली बजाव'चा प्रयोग रचतात.
Web Title: shiv sena asks air india define descipline