शिवसेनेचे "आरे ला कारे'ने उत्तर 

shivsena
shivsena

मुंबई - भाजपबरोबरची युती तोडल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेने आक्रमक प्रचाराची रणनीती अवलंबली आहे. यामध्ये "आरे ला कारे'ने उत्तर देण्याचा सडेतोड बाणा स्वीकारला आहे, तर टीकेची धार टोकदार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांची धोरणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत शाब्दिक हल्ला चढवतील, तर प्रदेश स्तरावरील भाजपच्या नेत्यांवर शिवसेनेचे दुसऱ्या फळीतील नेते हल्लाबोल करणार असल्याचे सांगितले जाते. 

भाजपबरोबरची युती तोडल्यानंतर शिवसेनेने स्वबळाची रणनीती अनेक डावपेचांसह अवलंबली आहे. मुंबईसह राज्यभरात भाजपला पिछाडीवर टाकण्याची एकही संधी सोडायची नाही, असा आदेश शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांना "मातोश्री'ने दिला आहे. त्यातच प्रचारादरम्यान भाजप नेते आणि महत्त्वाचे पदाधिकारी यांच्यावर शिवसेना पद्धतीने टीका, टोमणे मारत त्यांना घायाळ करण्याचे आक्रमक धोरण शिवसेनेच्या चाणक्‍यांनी आखल्याचे सांगितले जाते. 

उद्धव ठाकरे, संजय राऊत, रामदास कदम, दिवाकर रावते, ऍड. अनिल परब हे भाजप नेत्यांवर हल्ला चढवतील, तर खासदार अरविंद सावंत, आमदार नीलम गोऱ्हे, अरविंद भोसले हे प्रतिस्पर्ध्यांचा हल्ला परतवून लावणे, शिवसेनेवर होणाऱ्या अरोपांचा सामना करणे, बाजू मांडणे या जबाबदाऱ्या सांभाळणार असल्याचे सांगितले जाते. 

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार व पारदर्शकता हे कळीचे मुद्दे करीत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. खासदार किरीट सोमय्या, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीकेचा भडिमार सुरू केला असला तरी, या दोन नेत्यांना कसे गुंगवत ठेवण्याचा "प्लॅन' शिवसेनेने केला असल्याचे शिवसेनेतून सांगितले जाते. भाजप मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेनेला चव्हाट्यावर आणत असताना नागपूर महापालिकेतील भाजपचा भ्रष्टाचार शिवसेनेने खणून काढण्याचे ठरवले आहे. याची झलक शिवसेनेच्या आमदार ऍड. अनिल परब यांनी नुकतीच दिली आहे. 

भाजपपुढे आव्हान 
प्रचारादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांच्या आक्रमक शैलीचा आणि खास शेलक्‍या शब्दांचे प्रहार कसे परतवून लावायचे, याचे आव्हान भाजप नेत्यांपुढे यापुढील काळात राहणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांविरोधात लढताना तुटून पडले होते. त्या आठवणी पुन्हा जाग्या होणार असल्या तरी, मुंबईत शिवसेना नेत्यांचा सामना कसा करायचा, हा प्रश्‍न मुंबई भाजप नेत्यांना पडला असल्याचे सांगितले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com