'ती' बिच्चारी रांगेतच उभी आहे - शिवसेना

Shiv sena, BJP
Shiv sena, BJP

मुंबई - 'ती' सध्या काय करते?’ असा प्रश्न आम्हाला कोणी विचारलाच तर आम्ही सरळसोट सांगून टाकू की, गेल्या पन्नास दिवसांपासून ‘ती’ बिच्चारी रांगेतच उभी आहे, परिस्थितीशी झगडत आहे. भविष्याच्या चिंतेने ती ग्रासली आहे. ‘ती सध्या काय करते?’ या प्रश्नाचे उत्तर सिनेमाच्या पडद्यावर वेगळे आहे व प्रत्यक्ष जीवनात वेगळे आहे, असा टोला शिवसेनेने नोटाबंदीच्या मुद्द्यावरून भाजपला लगाविला आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात बँका व एटीएमबाहेर रांगा पहायला मिळत आहेत. अद्याप नागरिकांना पैसे मिळविण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेने आज (सोमवार) 'सामना' या मुखपत्राच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे. 

शिवसेनेने म्हटले आहे, की ‘ती सध्या काय करते?’ असा गमतीशीर प्रश्न सध्या विचारला जात आहे. ‘ती सध्या काय करते’ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन अशा प्रकारे जोरात सुरू असल्याने ‘नोटाबंदी’च्या संकटातही हा चित्रपट बऱयापैकी धंदा करील असे दिसते. ‘ती सध्या काय करते?’ असा प्रश्न आम्हाला कोणी विचारलाच तर आम्ही सरळसोट सांगून टाकू की, गेल्या पन्नास दिवसांपासून ‘ती’ बिच्चारी रांगेतच उभी आहे. दिल्लीच्या भररस्त्यावर ती स्वतःच विवस्त्र झाली व आक्रोश केला, तर अनेक ठिकाणी ‘नोटाबंदी’च्या अत्याचाराने ती तडफडून मेली. तिला सध्या अस्वस्थ वाटतंय. तिच्यातील आई, पत्नी, बहीण, आजी ही सर्व नाती नोटाबंदीच्या रांगेत मूक आणि बधिर होऊन उभी आहेत. तिला कोणी विचारलेच की, ‘‘बाई, तू काय करतेस?’’, तर ती धाय मोकलून रडू लागते. काँग्रेजी राजवटीत जे भोगायला लागले नाही ते स्वकीयांच्या राजवटीत भोगावे लागत आहे असा दोष स्वतःच्याच नशिबाला देते. नोटाबंदीमुळे बाजारपेठ मंदावली आहे. आर्थिक विकासाचा वेग कमी झाला आहे. त्याचा फटका अनेक छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांना बसला आहे. या व्यवसायांतील अनेकांना रोजगाराला मुकण्याची वेळ आली आहे.

‘ती’ विचारत आहे की, ‘‘माझ्या नवऱयाची, माझ्या मुलाची उद्या नोकरी जाईल. माझी चूल विझेल. त्याला कोण जबाबदार?’’ बांधावर राबणारी ‘ती’ विचारते आहे, ‘‘कालपर्यंत दुष्काळ, नापिकी, गारपीटीने शेतातील हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यंदा पाऊस बरा झाला. पीकपाण्याचीही कधी नव्हे ती बरकत आली. पण हाय रे दैवा, नोटाबंदीच्या निर्णयाने या बरकतीवरच कुऱहाड घातली. नोटाबंदीचा फटका बसल्याने माझ्या धन्याने काबाडकष्ट करून पिकवलेली वांगी, कांदा, बटाटा, टोमॅटो, हरभरा रस्त्यावर टाकावा लागला. या धक्क्याने माझ्या धन्याने जीवाचे काही बरेवाईट करून घेतले तर मी व माझी पोरेबाळे काय करू?’’ देशभक्तीच्याच गोळ्या खाऊन पोट भरता येत होते मग सीमेवर इतके जवान का मारले जात आहेत? कश्मीरच्या सीमेवर शहीद झालेल्यांची ‘ती’सुद्धा दुःखातून आणि धक्क्यातून सावरायला तयार नाही. नोटाबंदीमुळे दहशतवाद कमी झाल्याच्या बातम्यांकडे ती अफवा म्हणून बघते. भिंतीवर लटकवलेल्या शहीद पती आणि पुत्राच्या तसबिरीला प्रश्न विचारीत आहे. ‘‘पाहा, नोटाबंदीमुळे सीमेवर रक्तपात थांबला आहे, असे टीकास्त्र शिवसेनेने सोडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com