शिवसेना राष्ट्रीय राजकारणात उतरणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मुंबई - पक्षाच्या स्थापनेपासून केवळ महाराष्ट्रापुरतेच राजकारण करणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसप्रणीत "यूपीए' आणि भाजपच्या "एनडीए'विरोधात आकारास येणाऱ्या राजकीय समीकरणांत शिवसेनेची महत्त्वाची भूमिका असण्याची चुणूक हार्दिक पटेलच्या निमित्ताने शिवसेनेने दाखवली. 

मुंबई - पक्षाच्या स्थापनेपासून केवळ महाराष्ट्रापुरतेच राजकारण करणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसप्रणीत "यूपीए' आणि भाजपच्या "एनडीए'विरोधात आकारास येणाऱ्या राजकीय समीकरणांत शिवसेनेची महत्त्वाची भूमिका असण्याची चुणूक हार्दिक पटेलच्या निमित्ताने शिवसेनेने दाखवली. 

महाराष्ट्रात शिवसेनेची राजकीय ताकद असली तरी जम्मू-काश्‍मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतही शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. या ठिकाणी शिवसेनेने यापूर्वी निवडणुका लढविल्या असल्या, तरी त्या गांभीर्याने घेतल्या नव्हत्या. आता मात्र राष्ट्रीय स्तरावरील समीकरणांत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शिवसेना नेत्यांची इच्छा असल्याचे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. शिवसेनेने सध्या गोव्यातील निवडणूक जोमाने लढविली. गुजरातमधील पटेल पाटीदार समाजाच्या आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची "मातोश्री'वर भेट घेली. या वेळी गुजरातमधील निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याचे सूतोवाच ठाकरे यांनी केले. शिवसेनेने भाजपविरोध तीव्र केल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातधील निवडणुकीत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत हार्दिक पटेलच्या अनेक बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर कॉंग्रेस आणि भाजपच्या विरोधात नवीन समीकरणे तयार करण्यावर चर्चा झाल्याची माहिती या बैठकीला उपस्थित राहिलेल्या माजी खासदार ब्रिगेडिअर (निवृत्त) सुधीर सावंत यांनी "सकाळ'ला दिली. सावंत यांच्या नियमित भेटी हार्दिक पटेल याच्यासोबत होत असल्याने सावंत यांच्या वक्‍तव्याला महत्त्व प्राप्त होते. देशभरातील प्रमुख नेत्यांमध्ये नितीशकुमार यांचा प्रभाव आहे. नवीन राष्ट्रीय समीकरणांत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही समावेश असेल, असे सावंत यांनी सांगितले. देशातील राजकारणात शिवसेना-भाजपच्या जुन्या युतीचा नेहमीच दबदबा राहिला आहे. आता ही युती तुटल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे देशातील प्रमुख नेते आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. 

टोकाचे मतभेद समोरे 
सध्या मुंबईसह अन्य दहा महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना-भाजपमधील टोकाचे मतभेद समोर आले असून, यापुढे युतीचा विषय उद्धव यांनी बंद केला आहे. गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर, तसेच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देशातील राजकीय समीकरणे बदलणार असून, यात शिवसेनेच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.