छत्रपतींचा वापर क्षुद्र राजकारणासाठी नको - शिवसेना

shivsmarak
shivsmarak

मुंबई - महाराष्ट्रातील राजकारण्यांना आमचे एकच सांगणे आहे, छत्रपतींचा वापर क्षुद्र राजकारणासाठी करू नका. छत्रपती म्हणजे शिखर गाठलेले युगपुरुष आहेत. त्यांच्यावर ‘मालकी’ सांगण्याचा प्रयत्न करणार्‍यांना माती खावी लागेल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने भूमिपूजन केल्याची टीका करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यावरूनही वाद झाला होता. आता शिवसेनेने भाजपला सल्ला देत सामनातील अग्रलेखातून आपली भूमिका मांडली आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की महाराष्ट्राची 11 कोटी जनता व जगभरातील हिंदू हेच शिवरायांच्या विचारांचे वारसदार आहेत. तेव्हा मित्रांनो, इतिहासाचे भान ठेवा व राजकीय टाळ्या कमी वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, हे निदान महाराष्ट्राला तरी कुणी समजावून सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या नसांत व श्‍वासांत फक्त शिवाजी महाराजच आहेत, पण ‘शिवाजी’ महाराष्ट्रातच का जन्माला आले? याचे चिंतन काही मंडळींना करण्याची गरज आहे. शिवाजीराजांनी हिंदुत्वाला तेज दिले. लंगोटीतल्या सामान्य माणसांना लढण्याचे बळ दिले. जगातले पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन करून हिंदुत्वास अर्थ मिळवून दिला. अशा शिवाजीराजांचे भव्य असे स्मारक (तीन हजार पाचशे कोटी रुपयांचे) मुंबईच्या समुद्रात साकार होत आहे व त्याचे पूजन हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी केले. त्यामुळे सरकारातील अनेकांच्या अंगात तेवढ्या काळापुरता शिवरायांचा संचार झाल्याचे दृश्य वृत्त वाहिन्यांवरून पाहता आले. महाराष्ट्रात येऊन ज्याने शिवरायांना मानाचा मुजरा केला नाही तो राष्ट्रभक्त नाहीच असे आम्ही मानतो. पंतप्रधानांच्या उपस्थितीत जो शिवस्मारक जलपूजनाचा राजकीय पक्ष सोहळा पार पाडला, त्यावर सरकारातील घनिष्ठ मित्रपक्षांनीच ‘संतापी’ तलवार उचलली आहे! हा शिवस्मारकाचा सोहळा म्हणावा की, भारतीय जनता पक्षाचा निवडणूक उत्सव? शिवाजी महाराज ही एकपक्षीय मक्तेदारी आहे काय, असा प्रश्‍न राजू शेट्टी यांनी विचारला. 

भाजपच्या मिरवणूक सोहळ्यातून शिवस्मारक महामंडळाचे अध्यक्ष विनायक मेटे संतापून निघून गेले, पण एव्हाना त्यांचा संताप प्रथेप्रमाणे थंड पडला असेल. शिवस्मारक हे स्वार्थी राजकारणाच्या गुंत्यात जखडून पडू नये व असे राजकारण करणार्‍यांवरच भवानी तलवार चालविण्याची वेळ प्रत्यक्ष महाराजांवर येऊ नये. प्रत्यक्ष सभा मंडपात शिवसैनिक व शिवप्रेमी जनता ‘जय भवानी, जय शिवाजी’चाच गजर करीत असताना सत्ताधारी पक्षांचे लोक पुढे बसून ‘मोदीं’चा गजर करीत होते. आम्ही स्वत: मोदी यांचे भाजपातील महत्त्व जाणतो. भाजपने आतासे बाळसे धरले आहे ते मोदी टॉनिकमुळेच. हे खरे असले तरी शिवाजी महाराजांपुढे कुणाची तुलना होऊ शकेल काय? स्वत: मोदीदेखील हे मान्य करणार नाहीत. मोदी हे स्वत: शिवाजीराजांचा आदर्श मानतात व त्यांच्या शिवशाहीचे गुणगान करतात, पण महाराष्ट्र धर्माची अखंड जोपासना हीच शिवरायांना खरी मानवंदना. त्यासाठी महाराष्ट्रातील नव राज्यकर्त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मत अग्रलेखातून व्यक्त करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com