'जीएसटी'ला अखेर शिवसेनेचे समर्थन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 मे 2017

मुंबई - वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) मसुदा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमारे सादर केल्यानंतर ठाकरे यांनी हा मसुदा आपल्यास मान्य असल्याचे जाहीर केले. ठाकरे यांनी त्यात काही सुधारणा सुचवल्या आहेत.

मुंबई महापालिकेला नियमितपणे पैसे मिळावेत, पैसे मागण्यासाठी राज्य सरकारपुढे प्रत्येक वेळी हात पसरावे लागू नयेत, दरवर्षी जी चक्रवाढ दिली जाते, ती वाढवून द्यावी, अशी अपेक्षा ठाकरे यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यावर मुनगंटीवार यांनी ही अपेक्षा मान्य असल्याचे माध्यमांशी बोलताना जाहीर केले.

"जीएसटी'चा सुधारित मसुदा अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मातोश्रीवर पाठवण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात काल रात्री भेट होणार होती; मात्र शिवसेनेने अभ्यासासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार आज भेट झाली. या बैठकीसाठी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई उपस्थित होते. बैठकीनंतर मुनगंटीवार आणि उद्धव यांचे फोनवर संभाषण झाले.

कॉंग्रेसची टीका
जीएसटी मसुद्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे विरोधकांना आयतेच कोलित मिळालं आहे. उद्धव ठाकरेंना घरी जाऊन जीएसटीचं प्रेझेंटेशन देणे म्हणजे घटनाबाह्य केंद्र निर्माण करण्याचा प्रकार असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली.