शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 एप्रिल 2017

मुंबई - शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर भेट घेतली. शिवसेना आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि शेतकरी कर्जमाफी हे मुद्दे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे सांगण्यात आले.

मुंबई - शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर भेट घेतली. शिवसेना आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि शेतकरी कर्जमाफी हे मुद्दे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्राधान्याचा विषय आहे. शिवसेना आजही कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा लढा सुरू राहील. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अर्थसंकल्पात आणि सभागृहात आश्वासन दिले आहे, असे शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीनंतर सांगितले.

शिवसेना आमदारांच्या विकासनिधीसंदर्भात समतोल साधला जाईल. ज्या मतदारांनी निवडून दिले आहे. त्यांची विकासकामे करणे ही माफक अपेक्षा आहे. त्यासाठीच आमची ही प्रमुख मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. यापुढे शिवसेनेच्या कुठल्याच आमदाराची नाराजी राहणार नाही, असा प्रयत्न मी करेन असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले आहे. निधी वाटपाबद्दल कोणावरही अन्याय करणार नाही. हे सरकार शिवसेना आणि भाजपचे आहे. यापूर्वी भाजपच्या आमदारांना जास्त निधी आणि शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला जात होता. आता यापुढे शिवसेना-भाजपच्या आमदारांना समान निधीवाटप केले जाईल. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास आहे. अर्थसंकल्पात जी नाराजी होती ती आता दूर झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीवर सभागृहात आश्वासन दिलेले आहे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या वेळी सांगितले.