संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत केंद्रे सुरू राहणार - देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मार्च 2017

मुंबई - राज्यात या वर्षी तुरीचे उत्पादन वाढल्याने खरेदीसाठी केंद्रे सुरू आहेत. आवश्‍यकतेनुसार केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. हमीभावापेक्षा तुरीचे भाव जोपर्यंत वाढत नाहीत तोपर्यंत सरकारमार्फत हमीभावाने तूर खरेदी करणार असल्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.

या संदर्भात सदस्य एकनाथ खडसे यांनी लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. त्याला उत्तर देताना देशमुख बोलत होते. देशमुख म्हणाले की, या वर्षी तुरीचे उत्पादन तीनपटीने वाढले असून, उत्पादन झाले आहे. शेतकऱ्यांचे हजार कोटी रुपये दिले आहेत; तसेच आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्यात येतील. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. हमीभावापेक्षा तुरीचे भाव जोपर्यंत वाढत नाहीत तोपर्यंत सरकारमार्फत हमीभावाने तूर खरेदी करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे; तसेच "नाफेड'ची खरेदी मर्यादा वाढविण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

यंदा तुरीचे उत्पादन वाढल्याने बारदानाची समस्या निर्माण झाली होती. ती समस्या सोडविण्यात सरकार प्रयत्नशील असून, राज्यात आता मोठ्या प्रमाणात बारदानाची आवक सुरू आहे. जेथे बारदान कमी आहे अशा ठिकाणी पुरविण्याचे काम सुरू आहे; तसेच काट्यांची संख्याही वाढविण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यात आवश्‍यकता आहे तेथे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. शेतकऱ्यांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, याची सरकार काळजी घेईल, असेही ते म्हणाले.