राज्यात आता तंबाखूमुक्त शाळा उपक्रम

संतोष सिरसट
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

सलाम मुंबई फाउंडेशन देणार शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण

सलाम मुंबई फाउंडेशन देणार शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण
सोलापूर - भाजप-शिवसेना युतीचे सरकार शैक्षणिक क्षेत्रात "सरल', "यू-डायस' याबरोबरच "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' यांसारखे उपक्रम राज्यभर राबवत आहे. आता मुंबई येथील सलाम मुंबई फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त केल्या जाणार आहेत. यासाठी हे फाउंडेशन शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे.

राज्यातील शैक्षणिक संस्थांची स्थिती पाहिली, तर तंबाखूजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर यामध्ये होत असल्याचे दिसून येते. अनेक वेळा याचा परिणाम बालकांच्या मानसिक आरोग्यावर होतो. मुलांना विद्यादानाचे काम करणारे शिक्षकच अनेकवेळा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन शाळांमध्ये करताना दिसतात. याबाबत जागृती करण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. या फाउंडेशनने गेल्या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने जुलै ते जानेवारी या कालावधीत 20 जिल्ह्यांतील 478 तज्ज्ञ मार्गदर्शक आणि 11 हजार 229 जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांना "तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था' या विषयावर प्रशिक्षित केले आहे.

या उपक्रमामुळे यवतमाळ जिल्ह्यातील दोन हजार 109 शाळा तंबाखूमुक्त बनल्या आहेत. त्याचबरोबर सांगलीतील वाळवा, रायगडमधील श्रीवर्धन, नांदेडमधील हदगाव, पुण्यातील हवेली व चंद्रपूर जिल्ह्यातील पोंबुर्ना हे तालुके तंबाखूमुक्त तालुके म्हणून घोषित होणार आहेत, असा दावा फाउंडेशनने केला आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी "तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था' हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा उपक्रम राबविताना शाळांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही, या अटीच्या आधीन राहून या फाउंडेशनला योग्य ते सहकार्य करण्याचे आदेश राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक व सर्व जिल्ह्यांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना प्राथमिकचे शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.

असे असतील उपक्रम
राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटशिक्षणाधिकारी, प्रत्येक तालुक्‍यातून दोन तज्ज्ञ मार्गदर्शक यांना प्रशिक्षण देणे, तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांना प्रशिक्षण देणे, डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांत सलाम फाउंडेशन किंवा स्थानिक सामाजिक संस्थांकडून जिल्हा परिषद शाळांना भेटी देणे, हे उपक्रम होतील.