आम्ही गडकोटांवर अनुभवतो छत्रपती शिवाजी महाराज

आम्ही गडकोटांवर अनुभवतो छत्रपती शिवाजी महाराज
आम्ही गडकोटांवर अनुभवतो छत्रपती शिवाजी महाराज

भटकंती करणाऱ्यांनी जयंतीनिमित्त व्यक्त केल्या भावना

डॉल्बीचे थर, डीजेचा धिंगाणा, मोठमोठाले डिजिटल बॅनर, विद्युत रोषणाई, फटाक्‍यांची आतषबाजी आणि इतर अनावश्‍यक खर्च.. हे सध्याच्या जयंती उत्सवाचे स्वरूप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती.. मर्दानी खेळ, लेझीम, कुस्त्या, दांडपट्टे व तलवारी चालवणे, शक्तिप्रदर्शन हे सारं महाराजांच्या काळात व्हायचं. त्या काळी नाचगाण्यांची प्रथा नव्हती. जयंती उत्सवाच्या काळात अनावश्‍यक विषयांवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झालेल्या गटकोटांना भेट द्यायला हवी. महाराष्ट्रतल्या अनेक संस्था, संघटना, व्यक्ती गडकोटांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज वेगळ्या पद्धतीने अनुभवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गडकोटांवर भटकंती करून इतिहास वेगळ्या पद्धतीने जाणून घेणाऱ्या गडकोटप्रेमींशी शिवजयंतीनिमित्त केलेला हा संवाद..

नाचगाण्यांची प्रथा महाराजांच्या काळात नव्हती
350-400 वर्षापूर्वीचा काळ आपण पाहू शकलो नाही, पण ज्यांनी पाहिला, अनुभवला ते म्हणजे गडकोट होय. छत्रपती शिवराय अन गडकोट हे अविभाज्य समिकरण आहे. मन आणि मनगट बळकट करायचे असेल तर गडकोटांकडे जायला हवे. प्रत्येक गडकोटाला स्वत:चा असा एक इतिहास आहे. तो अनुभवायला हवा. किल्यावर पाहण्यासारखे काहीच नाहीये ! असे कित्येकांचे म्हणणे असते. त्याला कारण म्हणजे त्यांची इतिहास विषयाबद्दल असलेली अनास्था. गडकोटांचा इतिहास आणि भूगोल जर माहित करुन घेतला तर याच गडकोटांवर खुप काही गोष्टी आपणाला ज्ञात होतात. शिवजयंती असली की आठवडाभर महाराजांचे पुतळे उभे केले, मंडप बांधायचा आणि डॉल्बी लावून मिरवणूक काढायची. हे करून महाराजांप्रती असलेली शिवभक्ती दाखवली जाते. पण खरेच याची गरज आहे का? ज्या प्रकारे मिरवणुकीत नाच गाणे चालतात आणि जी नाचतात त्यांना एकदा खरोखरच गडकोटांवर न्यायला पाहिजे. या नाचगाणे करणाऱ्यांपैकी किती जण गडकोटांना भेटी देतात? किती लोकांना शिवरायांबद्दलचा इतिहास माहिती आहे? शिवरायांची युद्धनिती, आरमार, अर्थकारण, राजकारण, स्थापत्यकला, गडकोट बांधनी, कर वसूली, शेतकऱ्यांबद्दलचे धोरण असे अनेक विषय आहेत की ज्याबद्दल या लोकांना काडीचीही माहिती नसते. किंबहुना याच्याशी त्यांचा काही संबंधच नसतो. असतो तो फक्त डॉल्बी लावून नाचण्याचा. हिंदुस्थानच्या आजपर्यंतच्या कित्येक राजांसमोर नर्तिका नाचल्या असतील परंतु जगामध्ये एकमेव छत्रपती शिवराय असे आहेत की, "स्त्री ही आपल्या घराच्या देवघरात पूजनीय असावी'. असा त्यांचा विचार होता. दरबारात नाचगाण्यांची प्रथाच महाराजांच्या काळात नव्हती. त्या काळात व्हायचे ते मर्दानी खेळ, लेझीम, कुस्त्या, दांडपट्टे व तलवारी चालवणे, शक्ती प्रदर्शन. आज या गडकोटांची फार दयनीय अवस्था झालेली आहे. मोजके किल्ले सोडले तर कालांतराने "येथे किल्ला होता' असे म्हणण्याची वेळ येईल. एकटे सरकार काय करणार? निधी उपलब्ध करून देईल, डागडुजी करून घेईल, पुन्हा किल्ल्यांवरती बुरुज देखील उभे करतील. पण.. अशा गडकोटांवर गेलेली तरुणाई आपले नाव लिहून गडकोटांचा अपमान करीत आहे. काही जण तर पडायला आलेल्या बुरजावर चढून मुद्दाम दगडांना ढकलून देतात. तेथील असलेल्या उरल्या सुरल्या अवशेषांची नासधूस करतात हे थांबविण्यासाठी आज काही संस्था प्रयत्नशील आहेत. वर्षभरातून कित्येक वेळा अबाल वद्धांना या गडकोटांचे दर्शन करण्यासाठी घेऊन जात असतात. तेथे स्वच्छता मोहिमा राबविल्या जातात. तेथील इतिहास व भूगोल तसेच तेथील ऐतिहासिक घटनांची माहिती देतात. आपल्या इतिहासाची आपणच जपवणूक केली पाहिजे. पुढच्या पिढीला हे सारे वैभव नजरेसमोर आणून दाखवले पाहिजे. त्यांच्याही मनात इतिहासाविषयी जागृती निर्माण केली पाहिजे.
- अमोल मोहिते, कार्याध्यक्ष हिंदवी परिवार, महाराष्ट्र राज्य

गडकोट भ्रमंतीमुळे संकटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो
महाराष्ट्राचा उज्वल इतिहास ज्यांनी निर्माण केला अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव सर्वत्र सुरु आहे. महाराजांना ज्या गोष्टी अभिप्रेत असतात अशा किती गोष्टी आपण उत्साहाच्या भरात विसरून जातो. खरंच यासाठीच केली होती का त्यांनी स्वराज्याची स्थापना? काही वेगळ्या पद्धतीने नाही करू शकत का आपण शिवजयंती..? छत्रपती शिवाजी महाराज हे नाव समोर आलं की समोर येतात ते भव्यदिव्य असे गडकोट. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करताना काही किल्ल्यांची बांधणी केली तर काही शत्रूंकडून मिळविले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे शौर्य, इतिहास खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचं असेल तर गडकोटावर भ्रमंती करायलाच हवी. आमचे गुरुवर्य, शिवचरित्र्य व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्यासोबत आम्ही वर्षातून दोनवेळा गटकोटांची भ्रमंती करतो. आजवर मी पन्हाळगड-पावनखिंड, प्रतापगड, मकरंदगड, रायरेश्वर यासारख्या अनेक गडांवर गडभ्रमंती केली आहे. प्रत्येक गडाचा स्वतःचा असा ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गड हा त्याच्या त्याच्या वैशिष्ट्यानुसार निर्माण केला आहे. गड भ्रमंती करताना आपल्याला महाराजांच्या तसेच मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमाचा प्रत्यय येतोच. सोबतच स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जाणिवांचा प्रत्ययही येतो. निसर्गाला जवळून पाहण्याची संधी मिळते. आपण काय आहोत हे समजून येते. आपण काय नाही आहोत याची जाणीव प्रकर्षाने होते. तसे तर प्रत्येक गड भ्रमंती ही वैशिष्ट्य पूर्ण असते. पण मला सर्वात जास्त आवडणारी भ्रंमती म्हणजे हिंदवी परीवाराबरोबर दोन वेळा केलेली पन्हाळगड-पावणखिंड भ्रमंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने आणि बाजी प्रभू, शिवा काशीद यांच्या सारख्या अनेक मावळ्यांच्या बलिदानाने पावण झालेल्या पावन खिंडीत प्रत्यक्ष जाण्यास संधी यानिमित्ताने मिळते. अदभूत असा निसर्ग पहायला मिळतो. गडकोट भ्रमंतीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांनी ज्या भूमीवर केला तिथे प्रत्यक्ष जाऊन अनुभवा येतो. जीवन जगताना येणाऱ्या छोट्या मोठ्या संकटांकडे आपला पाहाण्याचा दृष्टिकोनही बदलतो. पर्यावरणाचे महत्व आणि त्याच्या संवर्धनाचे जबाबदारीही समजून येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या गडकिल्यांचे महत्व आजच्या युवा पिढीला समजून सांगितले पाहिजे.
- डॉ. वैशाली आगावणे, पर्यावरणप्रेमी, सोलापूर

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग
आपल्या पूर्वजांनी दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली होती. प्राणापलीकडे जपली होती. रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रात म्हटले आहे, "संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. गडकोट विरहित जे राज्य ते अभ्रपटल न्याय आहे. हे सर्वांत रक्षणीय जे गडकोट तीर्थ होय.' आपल्या महाराष्ट्रात उणेपुरे लहानमोठे सुमारे पाचशे किल्ले. बखरीत उल्लेख आहे, हजरतीस तीनशे साठ किल्ले आहेती! यापैकी उणेपुरे अडीचशे गड तरी सध्या जिवंत आहेत. आजवर मी फक्त 58 गडकोटांची वारी केलीय. ज्यांचं स्मरण होताच मस्तक नम्र होते, बाहू स्फुरण पावतात, शरीरावर रोमावळी उभ्या ठाकतात, तो दिग्विजयी शिवाजी राजा यानं चार-दोन रात्री तरी या किल्ल्यांवर घालविल्या आहेत. तेव्हा- शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे, ते या तटाबुरूजांनी अनुभवलं असणार. या तटा-बुरूजांना जर वाचा फुटली तर हे आपल्या कानी ते कुजबुजतील. म्हणतील, होय गडेहो, तो पवित्रात्मा आम्ही कोणे एके काळी आमच्या अंगाखांद्यावर वागविला आहे. जोपर्यंत डीजेच्या तालावर थिरकणारी पावलं या पवित्र शक्तीस्थळांकडे वळणार नाहीत, जोवर इतिहास ध्यानी घेत नाहीत, तोवर तो केवळ एक भूमीखंड आहे. इथल्या मातीच्या प्रत्येक ढेकळाला त्या शूर पूर्वजांनी धरतीवर सांडलेल्या रक्ताचा गंध आहे. तो आपल्याला जाणवायला हवा. यावेगळं अगदी निसर्गसौंदर्याच्या दृष्टीनं जरी किल्ल्यांकडे पाहायचं म्हटलं तरी अशी ही रोमहर्षक, अशी ही चैतन्यमय अशी ही तरूणाईस हाक घालणारी स्फूर्तीस्थळे अन्यत्र शोधून सापडायची नाहीत.'
- विनीत पलगंटी, ट्रेकर, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com