शेतकऱ्यांना अपात्र ठरल्यानंतरही कायम राहणार हमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

शेतकऱ्यांसाठी दहा हजारांचे तातडीचे कर्ज नियमात सुधारणा

शेतकऱ्यांसाठी दहा हजारांचे तातडीचे कर्ज नियमात सुधारणा
सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत काही कालावधी जाण्याची शक्‍यता आहे. सध्या खरिपाच्या पेरण्यांचा हंगाम असल्याने खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने दहा हजार रुपयांचे तातडीने कर्ज देण्याची सूचना शासन निर्णयाद्वारे जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना केली आहे. कर्जमाफी योजनेत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाही राज्य सरकारची हमी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला; परंतु या निर्णयासोबत काही निकषही दिले होते. या निकषांची पडताळणी कोणी करायची? या निकषात जर शेतकरी बसत नसेल आणि त्याने दिलेली माहिती खोटी आढळल्यास दिलेल्या दहा हजार रुपयांच्या कर्जाची हमी कोण घेणार? असे महत्त्वाचे प्रश्‍न राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी उपस्थित केले होते. त्यामुळे 14 जूनला घेतलेल्या या निर्णयाचा फारसा लाभ शेतकऱ्यांना झाला नव्हता. बॅंकांनी दहा हजार रुपयांचे कर्ज न दिल्याने हा निर्णय कागदावरच राहिला होता. बॅंकांची ही अडचण राज्य सरकारने आता दूर केली आहे. एखादा शेतकरी कर्जमाफीला अपात्र जरी ठरला तरी दहा हजार रुपयांच्या तातडीच्या कर्जासाठी राज्य सरकारने दिलेली हमी कायम ठेवण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. शपथपत्रातील माहिती शेतकऱ्यांनी स्वयंघोषित शपथपत्र करून द्यायची आहे. त्यामुळे आता बॅंकांना डोकेदुखीचा कोणताही मुद्दा राहिलेला नाही.

राज्य बॅंकेची तयारी
दहा हजार रुपयांचे तातडीचे कर्ज देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे निधी नसेल तर अशा बॅंकांनी मागणी केल्यानंतर त्यांना प्री-फायनान्ससाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने दाखविली असल्याची माहिती बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी दिली.