प्रवाशांनी अनुभवला मृत्यूच्या दाढेतला प्रवास 

प्रवाशांनी अनुभवला मृत्यूच्या दाढेतला प्रवास 

सोलापूर - पावसाची रिप रिप... सर्वत्र अंधार पडलेला... घाटाची धोकादायक वळणे आणि त्यातच एसटीची पुढील दिवे बंद पडलेले... अशा स्थितीत तब्बल 
शंभर प्रवाशांनी मृत्यूच्या दाढेतला प्रवास कसा असतो याचा अनुभव रविवारी (ता. 18) घेतला. म्हसवड ते पंढरपूर दरम्यान सुमारे 68 किलोमीटरचा हा प्रवास रात्रीच्या अंधारात रामभरोसे झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. 

साताऱ्याहून सोलापूरकडे निघालेली मेढा आगाराची मेढा ते तुळजापूर (क्र. एमएच-14, बीटी- 3079) एसटी म्हसवडला पोचल्यावर रिलेची यंत्रणा अकार्यरत झाली. त्यामुळे गाडीचे पुढील दिवे बंद पडले. म्हसवडला आगार नसल्याने एक तर एसटी साताऱ्याला परत नेणे किंवा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणे हे दोन पर्याय चालकासमोर होते. चालक व वाहकांनी गावात जाऊन खासगी कामगाराकडून दिव्यांची तात्पुरती दुरुस्ती करून घेतली. यानंतर अंधुक प्रकाशात एसटीचा पुढील प्रवास सुरू झाला. दिव्यांचा उजेड जास्तीत जास्त दहा ते पंधरा मीटरपर्यंतच जात होता. त्यामुळे लांबून येणारे वाहन दुचाकी आहे की चारचाकी हे त्या वाहनाच्या दिव्यांवरून समजून घ्यावे लागत होते. रिलेच्या वायरी थेट जोडल्याने सिग्नलही दाखविणे अशक्‍य झाले होते. 

एसटीने म्हसवड सोडल्यावर पाऊस सुरू झाला. बाहेर अंधार अशा परिस्थितीत पिलिवचा धोकादायक घाट सुरू झाला. रात्री प्रवासावेळी एसटीतील दिवे बंद केले जातात. मात्र इतर वाहनांना एसटी दिसावी म्हणून हे दिवे सुरू ठेवले. समोरून येणाऱ्या वाहनांच्या दिव्यांच्या उजेडात प्रसंगवधान राखीत एसटी चालवून चालकाने घाटातील प्रवास पूर्ण केला. भाळवणीच्या पुढे पथदिवे सुरू असल्याने पंढरपूरपर्यंतच्या प्रवासाला अडचण आली नाही. मात्र म्हसवड ते पिलीव घाट उतरेपर्यंत हा मृत्यूच्या दाढेतलाच प्रवास असल्याचा अनुभव प्रवाशांना आला. 

परिवहन राज्यमंत्र्यांचा प्रतिसाद नाही 
लांब पल्ल्याच्या मार्गासाठी चांगल्या स्थितीतल्या एसटी देणे आवश्‍यक आहे. प्रवासादरम्यान ही बाब लक्षात आल्यावर प्रवाशांनी सोलापूरचे पालकमंत्री व परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांच्याशी रात्री पावणेनऊच्या सुमारास संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

"विनावाहक' वाल्यानेही टोलविले 
मेढा आगाराची एसटी पंढरपूरला पोचल्यावर, त्या ठिकाणी पंढरपूर ते सोलापूर विनावाहक एसटी उभी होती. सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना त्यात बसू देण्याची विनंती मेढा एसटीतील वाहकाने केली, मात्र त्यास प्रतिसाद दिला नाही. विनावाहक एसटीमध्ये जवळपास पंधरा आसने रिकामी होती. आपत्कालीन स्थितीत तरी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी समजुतदारपणा दाखविला पाहिजे, असे मत या वेळी ज्येष्ठ प्रवाशांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com