सरकारला गुडघे टेकायला लावू - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सोलापूर - शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केले. 

सोलापूर - शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केले. 

खासदार शेट्टी म्हणाले, ""अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील पदयात्रा 16 सप्टेंबरपासून सुरू होईल. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील जंतरमंतरवर दहा लाख शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले जाणार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम सरकारकडून झाले नाही. आयात-निर्यातीची चुकीची धोरणे, शेतमालाचे पडलेले बाजारभाव, पूर्वी 28 हजार कोटी रुपयांच्या शेतमालाची आयात होत होती, आज एक लाख कोटीवर गेली आहे. पूर्वी 42 हजार डॉलरपर्यंतचे चलन निर्यातीतून मिळत होते. आज ते 32 हजार डॉलरवर आले आहे, हे काय आहे? या अशा धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरसकट सात-बारा कोरा व्हायला हवा आणि उत्पादन खर्चाच्या 50 टक्के जादा नफा द्यावा.'' 

""कर्जमाफीमध्ये दहा लाख शेतकरी बोगस आहेत, असे स्वतः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले असता मुळात सरकारला किती माहिती आहे, हा प्रश्‍न आहे. 34 हजार कोटींची कर्जमाफी म्हणतात, पण सगळ्या नियम, अटी, निकषाचा विचार करता अवघी 5-7 हजार कोटींची कर्जमाफी होईल, त्यातही राज्यातील शेतकऱ्यांकडे पीककर्ज किती, मध्यमकर्ज, दीर्घमुदत कर्जे किती, याची साधी आकडेवारी सरकारकडे नाही,'' असे खासदार शेट्टी यांनी सांगितले. 

कर्जमाफीचे अर्ज भरण्यास द्या मुदतवाढ 
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे दिलेल्या मुदतीत अर्ज भरून होणे अशक्‍य आहे. त्यामुळे सरकारने याची मुदत वाढवून देण्याची मागणी खासदार शेट्टी यांनी दिली. 

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना आश्‍वासने दिली. आता त्या प्रश्‍नांची सोडवणूक होत नाही, एकतर शेतीतले त्यांना कळत नाही आणि कळत असेल, तर ते दिशाभूल करून फसवत आहेत. 
- राजू शेट्टी, खासदार 

Web Title: solapur news raju shetty farmer