मंत्री 'तुपाशी' एसटी कर्मचारी "उपाशी'!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

रावतेंच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव; चार दिवस मेजवानी

रावतेंच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव; चार दिवस मेजवानी
मुंबई - एसटी महामंडळाचे लाखो कर्मचारी वर्षभरापासून वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते त्यांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त चार दिवस शाही "पाहुणचारा'त गुंतले होते. मंत्री, अधिकारी, एसटीतील कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांना त्यांनी मेजवानी दिली. त्यांच्या "मेघदूत' या सरकारी निवास्थानी हे स्नेहभोजन झाले.

रावते यांच्या लग्नाला 18 मे रोजी 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांनी शनिवारी (ता.20) मलबार हिल येथील मेघदूत या निवासस्थानी स्नेहभोजन ठेवले होते. शाकाहारी, मांसाहारीसह गोड खाद्यपदार्थाचीही रेलचेलच होती. खास पाहुण्यांसाठी तर "रिटर्न गिफ्ट'ही होते. शनिवारी मंत्री व त्यांच्या स्वीय सहाय्यकांना आमंत्रित करण्यात आले होते. रविवारी (ता.21) नातेवाईक आणि मित्र परिवारांसाठी राखीव होता. सोमवारी (ता.22) एसटीचे अधिकारी, एसटीच्या कामगार संघटनांचे पदाधिकारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांसाठी तर मंगळवारी पत्रकारांसाठी स्नेहभोजन झाले.

वर्षभरापासून केवळ चर्चाच सुरू असल्याने एसटीतील लाखो कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबली आहे. वेतनवाढीसाठी कामगार संघटनाही संपाच्या तयारीत आहेत. असे एसटीतील कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, एसटीचे राज्यातील सर्व विभाग नियंत्रक, मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयातील एसटीच्या विविध विभागांचे महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रावते यांच्या मेजवानीचा आस्वाद घेतल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या नेत्याकडूनच चार दिवस मेजवानी सोहळा झाल्याने राजकीय वर्तुळातही याची चर्चा सुरू झाली आहे.

"त्यांना' वरण, भात!
एसटीचे अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांसाठी खास खाद्यपदार्थाची रेलचेल होती. मात्र, त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या वाहन चालकांची स्वतंत्र व्यवस्था होती. तेथे त्यांना वरण, भात, भाजी, पोळी खावूनच ढेकर द्यावा लागला.

यजमान नेमके कोण?
मेजवानीसाठी पत्रकारांना मंगळवारी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांची जबाबदारी एसटीतील जनसंपर्क विभागावर देण्यात आली होती. त्यामुळे हा सोहळा रावते यांचा वैयक्तिक आहे की एसटीचा आहे, अशी चर्चा सुरू होती.

माझा हा घरगुती सोहळा होता. त्यामुळे इतरांनी त्यात दखल देण्याची गरज काय? संपूर्ण विधानसभेला मी बोलावले नाही. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते व मंत्री उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी मित्रांना, तर तिसऱ्या दिवशी एसटी व आरटीओच्या काही अधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाल्याने हा सोहळा घेतला होता. त्यानिमित्त शेतकरी आत्महत्या आणि एसटी कर्मचारी वेतनवाढीचा प्रश्‍न उपस्थित करणे चुकीचा आहे.
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री, एसटी महामंडळ अध्यक्ष

महाराष्ट्र

पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या...

04.36 AM

मुंबई - भाजपच्या वाटेवर असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे गुरुवारी (ता. 21) घटस्थापनेच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गाबरोबरच...

04.33 AM

मुंबई - वडाळा आणि चेंबूर येथील माथाडी कामगारांच्या घरकुलांसंदर्भात येत्या दोन महिन्यांत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन...

03.39 AM