एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईत 22 रोजी धरणे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे -एसटी महामंडळाच्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करा, त्यांना सरकारच्या सेवेत विलीन करून घ्या, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने शनिवारी केली. या मागण्यांसाठी 22 मार्चला संघटनेचे कार्यकर्ते मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास सांगलीला होणाऱ्या संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात बेमुदत संपाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी दिली. 

ते म्हणाले, ""संघटनेने व्यवस्थापनाकडे वाढीव वेतन मिळण्यासाठी मागण्यांचा मसुदा सादर केला आहे. त्यात एक एप्रिल 2016 पासून 25 टक्के अंतरिम वाढ लागू करा, कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करा, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि एसटी कामगारांचे वेतन यातील तफावत दूर करा आदी प्रमुख मागण्या दिलेल्या आहेत. त्याबाबत व्यवस्थापनाशी वाटाघाटी सुरू असून, अद्याप निर्णय झालेले नाही.'' 

राज्य सरकारने यापूर्वी महामंडळाच्या प्रतिकूल आर्थिक स्थितीचे कारण पुढे करून एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यास मर्यादा आणल्या. मात्र, आता सरकारने आर्थिक बोजा स्वीकारून एसटी कामगारांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच सरकारी सेवेत विलीन करून घ्या, अशी मागणी संघटनेने केली असल्याचे ताटे यांनी सांगितले.