एसटी कामगार घेणार संप करण्यासाठी मतदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई - मागण्यांसाठी बेमुदत संप करावा का, याबाबत एसटी कामगारांची मते जाणून घेण्यासाठी प्रत्येक आगार आणि युनिटमध्ये 26 मे रोजी मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे मुंबई विभागीय सचिव राजन येलवे यांनी गुरुवारी दिली. 

एसटी कामगारांच्या वेतन कराराची मुदत गेल्या वर्षी 31 मार्चला संपली आहे; मात्र अजूनही वेतन करार न झाल्याने लाखो कामगार वेतनवाढीपासून वंचित आहेत. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी संघटना करीत आहे. सातवा वेतन आयोग देता येणार नाही, असा पवित्रा एसटी महामंडळाने घेतला आहे. त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना बेमुदत संपाची हाक देणार आहे. 

या संदर्भात संघटनेच्या मुंबई विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक 16 मे रोजी घेण्यात आली. या बैठकीनंतर कामगारांच्या मागण्यांचे निवेदन एसटी प्रशासनाकडे देण्यात आले आहे. त्याची दखल महामंडळाने न घेतल्यास नोटीस देऊन बेमुदत संप करावा का, याबाबत कामगारांचे मत जाणून घेण्यात येणार आहे, असे येलवे यांनी सांगितले.