डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाला प्रारंभ

डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाला प्रारंभ

कोल्हापूर - कानठळ्या बसवणाऱ्या डॉल्बीला (मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भाषेत सिस्टीम) सुट्टी देताना पारंपरिक वाद्यांचाच गजर करीत आज कोल्हापूरकरांनी विघ्नहर्त्या गणरायाचे स्वागत केले. सततची धावपळ काही काळ बाजूला ठेवून आबालवृद्ध गणरायाच्या या आनंदयात्रेत सहभागी झाले. ढोल-ताशा, लेझीम, ब्रास बॅंड आणि हलगी-घुमक्‍याच्या साथीने जल्लोषी मिरवणुका निघाल्या. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची नांदीच यानिमित्ताने झाली. साहजिकच बाप्पांच्या दहा दिवसांच्या मुक्कामातही आता कुठलेच प्रदूषण न करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. विसर्जन मिरवणुकीतही "नो डॉल्बी‘ अशीच साद त्यांनी पहिल्याच दिवशी घातली.

आज सकाळपासूनच कुंभार गल्लीत मूर्ती नेण्यासाठी गर्दी झाली. आनंदाला भरते आले. दुपारी दोन-अडीचपर्यंत घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी कुंभार गल्ल्या हाउसफुल्ल होत्या. त्यानंतर मात्र सार्वजनिक गणेश मंडळे मूर्ती नेण्यासाठी बाहेर पडली. मावळतीच्या सूर्याच्या साक्षीनेच पारंपरिक वाद्यांच्या ठेक्‍याला विविधरंगी प्रकाशझोतांची झालर लाभली. सारा आसमंत उजळून निघाला. वाद्यांच्या ठेक्‍यावर नाचणारी तरुणाई मिरवणुकीतील भव्य स्क्रीनवरही झळकत राहिली. राजारामपुरीतील सर्वच मंडळांनी डॉल्बीला मिरवणुकीतून हद्दपार केले. कसबा बावड्यात धनगरी ढोलपथकांनी मिरवणुकीची उंची वाढवली. शहरातील उर्वरित भागांसह उपनगरातही रात्री उशिरापर्यंत गणेश आगमनाचा हा सोहळा जल्लोषी वातावरणातच सजला.

सलाम मित्रांनो...! 

यंदाच्या उत्सवातून डॉल्बीला हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यामुळे साहजिकच राजारामपुरी परिसरावरच सर्वांच्याच नजरा होत्या. तेथील सर्वच मंडळांनी डॉल्बीला हद्दपार करून पर्यावरणपूरक उत्सवाची सलामी दिली. याची माहिती बघता बघता सोशल मीडियावरून शेअर होऊ लागली आणि "जे जे चांगलं आणि समाजहिताचे, त्याची सुरवात होतेय. सलाम मित्रांनो, सलामऽऽऽ‘ अशा शब्दांत तरुण मंडळांचे कौतुक सुरू झाले.

""गणेशोत्सवात डॉल्बी सिस्टीमच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचे विघ्न दूर करण्यासाठी सर्वांनीच केलेल्या प्रयत्नाला आज पहिल्याच दिवशी यश आले आहे. विसर्जनाच्या दिवशी या डॉल्बीचे आपण कायमचेच विसर्जन करू. गणरायानेच सर्वांना याबाबत सुबुद्धी दिली आहे. जिल्ह्याच्या विकासातही सर्वांनी अशाच पद्धतीने काम करावे.‘‘ 

- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

""पारंपारिक वाद्यांच्या जल्लोषात आज गणरायांचे आगमन झाले. सर्व लोकप्रतिनिधी, तरुण मंडळे त्यांचे पदाधिकारी व सर्वच कोल्हापूरकरांनी आपण जे ठरवतो ते करून दाखवतो, याची प्रचिती दिली आहे. आता विसर्जनाच्या दिवशीही आपण डॉल्बीमुक्त मिरवणूक काढून संपूर्ण राज्यासमोर आपला आदर्श ठेवूया.‘‘ 

- प्रदीप देशपांडे, जिल्हा पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com