१ जुलैला ‘राज्य मतदार दिवस’ साजरा होणार

जयपाल गायकवाड
शनिवार, 20 मे 2017

नांदेड : राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये १ जुलै रोजी ‘राज्य मतदार दिवस’ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी एक जुलै रोजी राज्य मतदार दिवस साजरा करण्यात यावा असे शनिवारी (ता.२०) शासन निर्णयाव्दारे आदेश दिले आहेत.

नांदेड : राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये १ जुलै रोजी ‘राज्य मतदार दिवस’ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी एक जुलै रोजी राज्य मतदार दिवस साजरा करण्यात यावा असे शनिवारी (ता.२०) शासन निर्णयाव्दारे आदेश दिले आहेत.

केंद्रिय निवडणुक आयोगाने भारतीय लोकशाही अधिक बळकट व्हावी या हेतूने मतदारांना जागृत करुन त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा या हेतूने ‘स्वीप’ या महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विविध माध्यमातून मतदारांबरोबर संपर्क साधून त्यांना लोकशाहीचे महत्व पटवून देण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेपासून कोणाताही मतदार वंचित राहु नये यासाठी प्रयत्नशील राहावयाचे आहे.

भारत निवडणुक आयोगाकडून दरवर्षी २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तथापि ‘स्वीप’ कार्यक्रमाची अंमलबजावणी केवळ ‘राष्ट्रीय मतदार दिन’ या पुरती मर्यादित राहु नये तर मतदार जागृतीचे काम निरंतर सुरु राहावे या हेतून दरवर्षी राज्यस्तरावर ‘राज्य मतदार दिवस’ व प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा मतदार दिवस साजरा करावा या असे निर्देश भारत निवडणुक आयोगाने दिले आहेत.

भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये राज्य मतदार दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव होता. यामुळे शनिवारी (ता.२०) शासन निर्णय घेण्यात आला. तसेच या कार्यक्रमाची जबाबदारी ही प्रधान सचिव व मुख्य निवडणुक अधिकारी यांच्या कार्यालयाची राहील. तसेच या कार्यक्रमाचे काय स्वरुप असले आणि कार्यक्रम कशाप्रकारे आयोजित करण्यात यावा, याबाबत भारत निवडणुक आयोगच्या वेळोवळी दिल्या जाणाऱ्या निर्देशानुसार आवश्‍यक सूचना प्रधान सचिव व मुख्य निवडणुक अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात येतील असे शासन निर्णयामध्ये दिले अाहे.