डॉ. आंबेडकरांच्या साताऱ्यातील घराबाबत पुरावे सादर करा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - साताऱ्याच्या सदर बाजार परिसरातील घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान संरक्षित स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय राज्य सरकारने कोणत्या कागदपत्रे-पुराव्यांच्या आधारे घेतला, याबाबतचा तपशील दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले. 

मुंबई - साताऱ्याच्या सदर बाजार परिसरातील घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान संरक्षित स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय राज्य सरकारने कोणत्या कागदपत्रे-पुराव्यांच्या आधारे घेतला, याबाबतचा तपशील दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले. 

डॉ. आंबेडकर 1896 ते 1904 दरम्यान या घरात कुटुंबासह राहायला होते आणि तेथील शाळेत त्यांनी काही काळ शिक्षणही घेतले, असा दावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने केला आहे. याबाबतचे पुरेसे पुरावे सरकारकडे आहेत. या आधारांवरच हे घर संरक्षित स्मारक म्हणून जतन करण्याची मागणी समितीने केली होती. सरकारने ही मागणी मान्य केली आहे; मात्र याविरोधात स्थानिक नागरिक लक्ष्मण आमने यांनी याचिका दाखल केली आहे. मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर नुकतीच सुनावणी झाली. संबंधित वास्तूत आंबेडकर यांनी वास्तव्य केल्याचा पुरावा सरकारकडे नाही, असा युक्तिवाद याचिकादारांच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वास्तू संरक्षित स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय सरकारने कोणत्या आधारावर घेतला आहे, याची सविस्तर माहिती दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. समितीच्या वतीने ऍड. संघराज रूपवते यांनीही बाजू मांडण्यासाठी अर्ज केला आहे. आंबेडकर यांचे वास्तव्य या निवासस्थानामध्ये होते, याचे पुरेसे पुरावे सरकारकडे सादर केले आहेत. त्यामुळे वास्तूला संरक्षित स्मारक म्हणून सुरक्षित ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी अंतिम सुनावणी 21 मार्चला आहे. 

Web Title: Submit evidence of Ambedkar house