सरकारमधून बाहेर पडल्यास शिवसेनेला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला सशर्त पाठिंबा देण्याचे कॉंग्रेसने सूचित केले आहे. टिळक भवन येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत भाजपला महापालिकेतील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास कॉंग्रेस नेत्यांनी तयारी दाखवली आहे. शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढल्यास विचार करू, असे सूचक वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

मुंबई महापालिकेत सत्ता समीकरणे जुळवण्यासाठी शिवसेना आणि भाजप यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांनी अपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत; सत्तेपर्यंत पोचण्यात ते पुरेसे नाहीत. महापालिकेत कॉंग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले आहेत. महापौर ठरवण्यात कॉंग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सत्तेपर्यंत पोचण्यासाठी भाजप आणि शिवसेनेला एकत्र यावे लागेल किंवा कॉंग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागेल, अशी सध्याची स्थिती आहे. पालिकेतील सत्तेपासून भाजपला दूर ठेवावे असा कॉंग्रेसमध्ये एक मतप्रवाह असल्याचे दिसते. शिवसेनेला पाठिंबा देता येईल का, याबाबत शुक्रवारी कॉंग्रेस नेत्यांची बैठक झाली. बैठकीत शिवसेनेने भाजपबरोबर युती करणार नसल्याचे जाहीर केल्यास पाठिंब्याबाबत विचार सुरू करता येईल, अशी चर्चा झाल्याचे कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. दरम्यान, राज्य सरकारमधून शिवसेना काडीमोड घेत नाही, तोवर युती करणार नाही, असे सूचक वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केल्याचे समजते.