"स्वाभिमानी' लढाई रस्त्यावर 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत आज विधान भवन परिसरात अभिनव आंदोलन केले, कांदा आणि तुरीला हमीभाव मिळण्याची मागणी करत त्यांनी रस्त्यावर कांदे फेकले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. 

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत आज विधान भवन परिसरात अभिनव आंदोलन केले, कांदा आणि तुरीला हमीभाव मिळण्याची मागणी करत त्यांनी रस्त्यावर कांदे फेकले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. 

राज्यात तूरडाळ आणि कांद्याच्या दराचा मुद्दा असला, तरी हे दोन्ही विषय केंद्राशी संबंधित आहेत, तरी खासदार असलेल्या शेट्टी यांनी आज मुंबईत आंदोलन केले. यामुळे कांदा आणि तुरीचे आंदोलन केवळ निमित्त असल्याची चर्चा आहे. हे दोन्ही विषय राज्यात सदाभाऊ खोत यांच्याकडे असलेल्या पणन खात्याशी संबंधित आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मुद्यांवर दिवसेंदिवस या दोन नेत्यांमधील दरी रुंदावतच जाणार आहे. 

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधान भवनाकडे जाणार रस्ता रोखून धरला. "स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी कांदा आणि तूरडाळीला हमीभाव मिळावा यासाठी विधान भवन प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर आंदोलन केले. स्वाभिमानीच्या या गनिमीकाव्याने विधान भवन परिसरात पोलिसांची एकच धावपळ उडाली. 

खासदार राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा आणि तूरडाळ फेकून सरकारचा निषेध केला. या आंदोलनामुळे काही काळ विधान भवन प्रवेशद्वाराजवळ वाहतुकीचा खोळंबा झाला. "स्वाभिमानी'चे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याही गाडीवर आंदोलकांनी कांदे फेकले. यामुळे स्वाभिमानीच्या रडारवर आता सदाभोऊ असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये विसंवाद निर्माण झाल्याच्या चर्चेला आता पुष्टी मिळाली आहे. 

शेट्टी यांच्या आंदोलनामुळे पोलिस यंत्रणा आणि राज्य सरकारची धावपळ उडाली, या वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी "स्वाभिमानी' नेहमीच आक्रमक राहील. वेळप्रसंगी सत्तेवर पाणी सोडू, पण शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर तडजोड नाही. 
- राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार 

शेतकऱ्यांच्या हितासाठीच मी मंत्रिमंडळात आहे. वेळोवेळी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितीचे निर्णय घेत असते. आताही शेतीमालाला भाव मिळावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. 
- सदाभाऊ खोत, कृषी आणि फलोत्पादन, राज्यमंत्री