राज्यात एक मेपासून स्वस्थ अभियान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 एप्रिल 2017

सहा जिल्ह्यांत पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम; गरजूंना मोफत उपचार करण्यात येणार

सहा जिल्ह्यांत पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम; गरजूंना मोफत उपचार करण्यात येणार
मुंबई - राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानाअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांत येत्या 1 ते 27 मे 2017 दरम्यान पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित रुग्णांवर पुढील तपासणी शासकीय योजनेतून मोफत होणार आहे. या मोहिमेसाठी संबंधित जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिल्या.

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यात पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांनी या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून सूचना दिल्या. महाजन म्हणाले, की मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य पूर्वतपासणीमुळे रुग्णांच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर शासनाच्या उपलब्ध योजनांमार्फत त्या रुग्णांना योग्य ते पुढील उपचार, शस्त्रक्रिया संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात येतील. यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागातील एक असे सहा जिल्हे घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील मोहिमेनंतर पुढील कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहिमेंतर्गत श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, हृदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मेंदूचे विकार, मूत्ररोग आदी वीस विषयांतील आजारांसंदर्भातील पूर्वतपासणी करण्यात येणार आहे. ही मोहीम राबविण्यासाठी राज्य स्तरावर वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्री सहअध्यक्ष आहेत, तर जिल्हा स्तरावर पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे.