"साहेब काय पण करा, मात्र गोळ्या द्या' 

"साहेब काय पण करा, मात्र गोळ्या द्या' 

मुंबई - " साहेब काय पण करा, मात्र स्वाइन फ्लूच्या पाच हजार गोळ्या पुणे महानगरपालिकेला पाठवायला सांगा...! सरकारच्या गोळ्या उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या उसनवारी तरी गोळ्या द्यायला सांगा. सरकारकडे गोळ्या तीन आठवड्यांनी उपलब्ध होतील. तोपर्यंत स्वाइन फ्लूने त्रस्त असलेल्या रुग्णांचे अतोनात हाल होतील...' ही कैफियत आहे सातारा जिल्ह्यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची..! 

शिक्षण व आरोग्यात महाराष्ट्राचा लौकिक देशाच्या तुलनेत तसा चांगला असला तरी, सध्या स्वाइन फ्लूच्या साथीने आरोग्य विभाग हादरला आहे. सातारा जिल्ह्यात या साथीने धुमाकूळ घालण्यास सुरवात केलेली असताना सरकारचा आरोग्य विभाग मात्र कागदी घोडे नाचवण्यात गुंतल्याचे चित्र आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने अद्याप स्वाइन फ्लूच्या औषधांची खरेदी केलेली नाही. सरकारच्या "पारदर्शक' धोरणाने प्रक्रिया लांबल्याचे सांगितले जाते. अशी खरेदी रास्त असली तरी साथीच्या रुग्णांचा जीव मात्र सरकारी लालफितीच्या कात्रीत द्यावा काय, असा सवाल उपस्थित होत आहे. 

साताराचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना सातारा जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्वाइन फ्लूच्या गोळ्यांसाठी अत्यंत विमनस्क मानसिकतेत संपर्क केला. मात्र, पुणे महानगरपालिका राज्य सरकारला कोणत्या आधारे अथवा नियमानुसार पुरवठा करणार, हा सरकारी सवाल कायम होता. अखेर मानवतेच्या दृष्टिकोनातून शिवतारे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पुणे महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला. पाच हजार गोळ्या काहीही करून द्या, असे सांगण्यात आले. पाच हजार गोळ्या मिळाल्या नाहीत, पण दोन हजार गोळ्या पुणे महापालिका आरोग्य विभागाने दिल्या. राज्य सरकारच्या गोळ्या उपलब्ध झाल्यावर त्या परत केल्या जातील, अशी हमी दिली. महाराष्ट्रात अत्यंत गंभीर आजाराच्या औषधांची ही "उसनवारी'ची पद्धत मात्र मंत्रालयातील चर्चेचा विषय बनली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com