मटक्‍याचे आकडे छापणाऱ्या वर्तमानपत्रांवर कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

मुंबई - जुगार किंवा मटक्‍याचे आकडे राज्यातील काही वर्तमानपत्रांमध्ये सर्रास प्रसिद्ध होतात. अशा वर्तमानपत्रांवर पोलिसांमार्फत कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच दिले. 

मुंबई - जुगार किंवा मटक्‍याचे आकडे राज्यातील काही वर्तमानपत्रांमध्ये सर्रास प्रसिद्ध होतात. अशा वर्तमानपत्रांवर पोलिसांमार्फत कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच दिले. 

सोलापूरमधील काही वर्तमानपत्रांमध्ये नियमितपणे मटक्‍याचे आकडे प्रसिद्ध होतात, असा आरोप करणारी जनहित याचिका श्रीगुरुराज पोरे यांनी न्यायालयात दाखल केली आहे. मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे नुकतीच या याचिकेवर सुनावणी झाली. सोलापूर पोलिसांनी याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आला. सोलापूरसह राज्यातील अन्य भागांमध्येही अशा प्रकारे आकडे प्रसिद्ध केले जातात, असा दावा याचिकादारांच्या वतीने ऍड्‌. अक्षय शिंदे यांनी केला. त्यामुळे मुंबईच्या पोलिस आयुक्तांसह सर्व जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत तपासणी करून, संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचे, तसेच अशा प्रकारचे आकडे प्रसिद्ध करण्यास असलेली अंतरिम मनाई या पुढेही सुरू ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याचिकेवर पुढील सुनावणी पुढील महिन्यात होणार आहे.