मुख्याध्यापक होण्यास शिक्षक देतात नकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

मुंबई - शिक्षकीपेशातला वाढता ताण पाहून मुख्याध्यापकपद स्वीकारण्यास शिक्षक नकार देत आहेत. दक्षिण मुंबईतील एका नावाजलेल्या शाळेतील सहा शिक्षकांनी मुख्याध्यापकपद नाकारले. याबाबत शिक्षकांच्या काही व्हॉट्‌सऍप ग्रुपवरही चर्चा सुरू आहे. 

वाढत्या सरकारी आदेशांना शिक्षक कंटाळले आहेत. शाळा चालवताना मुख्याध्यापकाला मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे शिक्षक हे पद नाकारत आहेत. पाच वर्षांपासून ही समस्या शिक्षण क्षेत्रात दिसू लागली आहे. मुख्याध्यापकपद नाकारण्याचे प्रमाण शहरांपेक्षा ग्रामीण भागांत जास्त आहे, अशी माहिती शिक्षक परिषदेचे मुंबई विभागप्रमुख अनिल बोरनारे यांनी दिली. शाळा व्यवस्थापनातील वाढते अडथळे, विविध योजना, समायोजनातील अडथळे यामुळे हे पद शिक्षक स्वीकारण्यास तयार होत नाहीत. वाढत्या सरकारी आदेशांमुळे शिक्षकांचे काम चुकल्यास त्याची जबाबदारीही मुख्याध्यापकांना घ्यावी लागत आहे. 

मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले, की सेवाज्येष्ठतेमुळे मुख्याध्यापकपद मिळाले तरी सेवानिवृत्तीला दोन-तीन वर्षे उरलेली असल्यास सहसा शिक्षक मुख्याध्यापकपद स्वीकारू इच्छित नाहीत. सेवाकाळ संपत असताना मानसिक ताण घेण्यास ते तयार नसतात.