'टीडीएफ'चा तंबू राजकीय उंटाच्या ताब्यात 

politics
politics

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांच्या विजयाने चोपन्न वर्षे जुन्या पुरोगामी शिक्षक चळवळीच्या वाताहतीवर शिक्‍कामोर्तब झाले आहे. "टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट' म्हणजे "टीडीएफ'च्या विविध शाखा व फांद्यांच्या आधारे विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रवेशाचे संदीप बेडसे, भाऊसाहेब कचरे, शालिग्राम भिरूड व आप्पासाहेब शिंदे यांचे मनसुबे निकालाने उधळले गेलेच. शिवाय विचारधारा व मुद्यांऐवजी मतांचे राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांचा जो उंट काही वर्षांपूर्वी "टीडीएफ'मध्ये शिरला होता, त्याने चळवळीचा तंबू पूर्णपणे ताब्यात घेतल्याचेही स्पष्ट झाले. 

विशेषत: जयवंत ठाकरे, नानासाहेब बोरस्ते या माजी आमदारांनी पुरस्कृत केलेल्या बेडसे यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. यानंतर राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. नव्या संघटनेच्या बांधणीचेही बोलले जात आहे. अर्थात, गेल्या वेळी डॉ. अपूर्व हिरे व यंदा किशोर दराडे या संस्थाचालक असलेल्या राजकीय उमेदवारांनी आर्थिक ताकदीवर हा मतदारसंघ जिंकल्याने, तसेच गुरुजनवर्गच आमिषांना बळी पडल्याने नवी बांधणी किती यशस्वी होईल, ही शंका आहेच. 

"टीडीएफ'चे जुनेजाणते व्यथित आहेत. सर्वश्री शिवाजीराव पाटील, गजेंद्र ऐनापुरे, टी. एफ. पवार, वसंतराव काळे, जे. यू. ठाकरे, नानासाहेब बोरस्ते, पी. एस. रेडकर, दिलीपराव सोनवणे आदींनी प्रतिनिधित्व केलेल्या संघटनेचे आता विधान परिषदेत थेट कोणी नाही. लोकभारतीचे कपिल पाटील यांच्या रूपाने अप्रत्यक्षरीत्या टीडीएफची विचारधारा सभागृहात थोडीबहुत अस्तित्वात असली, तरी मधुकरराव चौधरी, प्रकाशभाई मोहाडीकर, तात्यासाहेब सुळे आदी मोठ्या माणसांनी 1964 मध्ये सुरू केलेली पुरोगामी शिक्षकांची चळवळ साडेपाच दशकांत संपुष्टात आली, हाच नाशिकच्या निकालाचा अन्वयार्थ आहे. त्यातही थेट साने गुरुजींच्या विचारधारेचा वारसा सांगणाऱ्या, लोकशाही-समाजवाद-विज्ञाननिष्ठा-राष्ट्रीय एकात्मता- सर्वधर्मसमभावाची पंचसूत्री पुढे नेणाऱ्या आणि त्याचआधारे विद्यार्थ्यांची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांची चळवळ साने गुरुजींच्याच कर्मभूमीत संपुष्टात यावी, हा दैवदुर्विलास मानला जात आहे. 

प्रलोभनांची खैरात 
"टीडीएफ'च्या अंताची कारणमीमांसा शिक्षकीपेशाच्या बदलत्या स्वरूपात दडल्याचे अनेकांचे मत आहे. कधीकाळी कमी पगारातही जोपासला जाणारा ध्येयवाद, विद्यार्थ्यांच्या रूपाने राष्ट्रीय चारित्र्याची जडणघडण, देशाची उभारणी वगैरे गोष्टी इतिहासजमा झाल्या आहेत. जिल्हास्तरावरच्या पतसंस्था काबीज करण्याच्या प्रयत्नातून पैशांचे भांडण, गटबाजी सुरू झाली. त्यातून आता जितके कार्यकर्ते, तितकेच नेते या टप्प्यावर येऊन राजकीय मतभेद पोचले. प्रत्येकच निवडणुकीत कुंकू लावण्यापुरती "टीडीएफ' उरली. पंचसूत्री सोडा, संघटनेचे पूर्ण नावही उच्चारता येणार नाही, असेही निवडणुकीत उतरले. पैठणी, साड्या, पाकिटांची खैरात झाली व चळवळ संपली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com