टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

सोमाटणे - बाजार कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, उत्पादनातून फक्त खर्चच निघण्याची शक्‍यता आहे. 

सोमाटणे - बाजार कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, उत्पादनातून फक्त खर्चच निघण्याची शक्‍यता आहे. 

अल्पावधीत चांगला पैसा मिळवून देणारे पीक म्हणून पवनमावळातील उर्से, आढे, ओझर्डे, बऊर, शिरगाव, सांगवडे, कुसगाव, कासारसाई, मळवंडी, शिवणे, साळुंब्रे आदी गावांतील शेतकरी हिवाळी टोमॅटोचे पीक अधिक प्रमाणात घेतात. या वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे पावसाळी पीक पूर्ण वाया गेले होते. पिकासाठी केलेला खर्चही वसूल झाला नाही. हिवाळी हंगामातील टोमॅटो पिकाला मागणी वाढून चांगले पैसे मिळतील, या उद्देशाने शेतकऱ्यांनी पुन्हा नेहमीपेक्षा टोमॅटोची अधिक लावणी केली. पीकही चांगले आले; परंतु गेल्या महिनाभरापासून बाजारभाव फारसे वाढले नाहीत. सध्या ठोक बाजारपेठेत टोमॅटो पाच ते सहा रुपये किलो दराने विकला जातो आहे. पीक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केल्याने विक्रीतून फक्त खर्चच निघत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

त्यातच गेल्या दोन महिन्यांतील हवामानातील सततच्या बदलाने पिकावर परिणाम झाल्याने या वर्षी टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांना तोडणी केलेल्या टोमॅटोतून निवडून चांगलेच टोमॅटो बाजारात न्यावे लागतात. खराब फेकून द्यावे लागत आहेत. 

रोगापासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च अधिक करावा लागल्याने खर्च आणि विक्री समान होत असल्याने नफा मिळण्याची शक्‍यता वाटत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.