वृक्ष लागवडीचे सरपंचांना आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने एक विशेष ग्रामसभा घेऊन गावात लावल्या जाणाऱ्या वृक्षांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करावे आणि "वृक्ष लावा- गाव वाचवा' ही संकल्पना घराघरात पोचवावी, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व सरपंचांना पत्राद्वारे केले आहे.

राज्यात येत्या तीन वर्षांत 50 कोटी वृक्ष लागवड होणार असून यंदाच्या पावसाळ्यात होणाऱ्या वृक्षलागवडीच्या कामाच्या नियोजन आणि यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात पार पाडावयाच्या विविध कामांची कालमर्यादा निश्‍चित करून देताना यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना यापूर्वीच दिल्या आहेत.

येत्या पावसाळ्यात गाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी, लोकसहभागातून या कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी अधिकाधिक लोकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेणे, विषयाच्या अनुषंगाने जनजागृती करणे आवश्‍यक आहे. भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठीही मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीचे हे शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचेही मुनगंटीवार यांनी सरपंचांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.