तूर खरेदी केंद्रांवर दोन दिवसांत बारदाना 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील तूर खरेदी केंद्रांवर दोन दिवसांत बारदाना उपलब्ध होणार आहे. "नाफेड'मार्फत सध्या नऊ लाख 20 हजार बारदाना खरेदी करण्यात आला आहे. खरेदी केंद्रांवरील तुरीची त्वरित उचल करावी. तोपर्यंत नव्याने तूर खरेदीची प्रक्रिया स्थगित ठेवावी. खरेदी केंद्रांवरील संपूर्ण तुरीची उचल झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी. शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीची मर्यादा वाढवून देण्यासंदर्भात केंद्राने सकारात्मकता दाखविली आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे सांगितले. 

मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या दालनात राज्यातील तूर खरेदीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. राज्यातील तूर खरेदीचा फुंडकर व देशमुख यांनी आढावा घेऊन बारदानाअभावी ज्या ठिकाणी खरेदी केंद्र बंद आहे ते तातडीने सुरू करावे, असे निर्देश "नाफेड', अन्न महामंडळ, विदर्भ सहकारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

या वेळी फुंडकर यांनी दूरध्वनीवरून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याशी संपर्क साधून तूर खरेदी केंद्रावर येत असलेल्या अडचणींबाबत माहिती दिली. संपूर्ण तूर खरेदी केली जात नाही, तोपर्यंत केंद्रे सुरूच राहतील, असे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 
फुंडकर यांनी या वेळी केंद्रीय कृषिमंत्र्यांना शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीची असलेली मर्यादा वाढवून देण्याबाबत विनंती केली. 

फुंडकर म्हणाले, की विदर्भातील तुरीची खरेदी केंद्रे पूर्णपणे कार्यान्वित झाली पाहिजेत. राज्यात 31 लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. ती गेल्या 15 वर्षांतील विक्रमी असल्याचे त्यांनी सांगितले.