कोथिंबीर जुडी २९ रुपयांना!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

नारायणगाव - तापमानात वाढ झाल्याने जुन्नर बाजार समितीच्या येथील उपबाजारात कोथिंबीर व मेथीची आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. कोथिंबिरीच्या जुडीला शेकडा दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान या हंगामातील उच्चांकी भाव मिळाला आहे. 

नारायणगाव - तापमानात वाढ झाल्याने जुन्नर बाजार समितीच्या येथील उपबाजारात कोथिंबीर व मेथीची आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. कोथिंबिरीच्या जुडीला शेकडा दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान या हंगामातील उच्चांकी भाव मिळाला आहे. 

जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कोथिंबीर, मेथी या अल्प काळात येणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. मात्र या वर्षी तापमानात चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. येथील उपबाजारात मागील महिन्यात कोथिंबीर, मेथी व शेपूच्या सुमारे तीन लाख जुड्यांची आवक होत होती. कोथिंबीर व मेथीच्या जुड्यांना शेकडा पाचशे ते हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता. 

तापमानात वाढ झाल्याने आवक घटल्याने गेल्या चार दिवसांपासून उपबाजारात कोथिंबीर, मेथीसह टोमॅटोची आवक घटली आहे. उपबाजारात मंगळवारी रात्री कोथिंबीर, मेथी, शेपूच्या सुमारे दीड लाख जुड्यांची आवक झाली होती. कोंथबिरीला शेकडा एक हजार रुपये ते २९०० रुपयांच्या दरम्यान, मेथीला शेकडा पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान; तर शेपूला शेकडा तीनशे ते आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

टोमॅटो क्रेटला ३५० रुपये भाव
व्यापारी जालिंदर थोरवे म्हणाले, ‘‘उपबाजारात टोमॅटोच्या दीड हजार ते दोन हजार क्रेटची आवक होत आहे. क्रेटला (वीस किलो) प्रतवारीनुसार अडीचशे ते साडेतीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मात्र आवक कमी आहे. मागील वर्षी जून महिन्यात ४ लाख ६३ हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली होती. जून महिन्यात टोमॅटो क्रेटला सातशे रुपये ते एक हजार रुपयांच्या दरम्यान उच्चांकी भाव मिळाला होता. या वर्षी जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यात टोमॅटोची उशिरा लागवड झाली असून, टोमॅटोचा तोडणी हंगाम मे महिन्यात सुरू होईल.’’