उद्धव ठाकरे यांचा चालक 'कंबाटा'च्या 'पे रोल'वर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

मी जाहीर केलेली माहिती सत्य आहे. ती खोटी असल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे आरोप खोडून काढावेत.
- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

मुंबई - कामगारांची देणी थकवून कंपनीला टाळे लावणाऱ्या कंबाटा एव्हिएशनच्या "पे रोल'वर राजकीय आणि कुख्यात गुंडांच्या टोळीतील कामगार असल्याचे उघडकीस आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, गुंड अरुण गवळी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमदार नीतेश राणे यांच्या महाराष्ट्र समर्थ कामगार सेनेचाही त्यात उल्लेख आहे. यातील कर्मचारी प्रत्यक्ष कामावर येत नसतानाही त्यांना कंपनीकडून पगार दिला जात होता, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.

कंबाटा कंपनीच्या 2700 कर्मचाऱ्यांना वर्षभर पगार मिळालेला नाही. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेकडून या कामगारांची फसवणूक झाल्यावर त्यांनी समाजिक कार्यकर्त्या दमानिया यांची भेट घेतली होती. दमानिया यांनी याबाबत "मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेनेच या कामगारांचे नुकसान केले, असा आरोप दमानिया यांनी केला होता. त्यानंतर उद्धव यांनी स्वतः हा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याला महिना उलटत आला असतानाही कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्‍न सुटलेला नाही, त्यामुळे दमानिया यांनी कामगारांची यादीच जाहीर केली आहे. यात उद्धव यांच्या नावे सात कामगारांची, महाराष्ट्र समर्थ कामगार सेनेच्या नावे सात, राज ठाकरे यांच्या नावे दोन आणि अरुण गवळी याच्या नावावर 17 कामगारांची नोंद आहे.

उद्धव आणि समर्थ कामगार सेनेच्या नावाने असलेले कामगार प्रत्यक्ष कामावर येत नसतानाही त्यांना वेतन दिले जाते. "मातोश्री'वर काम करणाऱ्या सात जणांना कंबाटा कंपनी वेतन देत असून, त्यातील एक जण चक्क उद्धव यांचा वाहनचालक आहे. राणेसमर्थक चार कामगारांनाही काम न देताच वेतन दिले जात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला.

मी जाहीर केलेली माहिती सत्य आहे. ती खोटी असल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे आरोप खोडून काढावेत.
- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या