महापौर शिवसेनेचाच, मुख्यमंत्रीही ठरवणार - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल, असा विश्‍वास व्यक्त करताना राज्याचा मुख्यमंत्रीही शिवसेना ठरवेल, अशी गुगली टाकत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला बुचकळ्यात टाकले. हा निकाल एक सुरवात आहे, भाजपवर मात करण्यास आणखी थोडा वेळ थांबावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

शिवसेना भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांनी भाजपला टोले लगावले. 'भाजपने सत्ता, साधन आणि संपत्ती पणाला लावली होती. त्यामुळे त्यांना मिळालेल्या यशाची मोजणी त्या आधारावर करावी लागेल,'' असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईत शिवसेना हा सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे महापौर शिवसेनेचाच होईल. एवढेच काय मुख्यमंत्रीही शिवसेनाच ठरवेल, असे स्पष्ट करत भाजपला बुचकळ्यात टाकले. मी जे करतो ते थेट करतो, त्यामुळे पुढे काय निर्णय घेणार ते काही दिवसांत तुम्हाला सांगेन, असे सांगत त्यांनी राज्य सरकारच्या पाठिंब्याबाबत बोलणे शिताफीने टाळले.

मतदारांचे आभार व्यक्त करून ते म्हणाले, 'उत्तर भारतीयांची मतेही शिवसेनेला मिळाली. बेहरामपाड्यातही पहिल्यांदाच शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला आहे. मुस्लिम मतदारही शिवसेनेकडे वळू लागला आहे.'' या पत्रकार परिषदेत पहिल्यांदा उद्धव यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे उपस्थित होत्या.

याद्यांमधील घोळ कोणाचा?
मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे. मोठ्या प्रमाणावरील मतदारांची नावे यादीतून गायब आहेत. या घोळास निवडणूक आयोग जबाबदार असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यामागे काही षड्‌यंत्र आहे का, याचाही तपास निष्पक्षपातीपणे झाला पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.