'त्या' व्यंग्यचित्राबद्दल माफी मागतो : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

मुंबई : मराठा क्रांती मोर्चांसंदर्भात ‘सामना‘ या मुखपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंग्यचित्रावरून सुरू झालेल्या वादानंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेची जाहीर माफी मागितली. या वादग्रस्त व्यंग्यचित्राविषयी उद्धव यांनी माफी मागावी, अशी मागणी गेले काही दिवस केली जात होती. 

मुंबई : मराठा क्रांती मोर्चांसंदर्भात ‘सामना‘ या मुखपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंग्यचित्रावरून सुरू झालेल्या वादानंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेची जाहीर माफी मागितली. या वादग्रस्त व्यंग्यचित्राविषयी उद्धव यांनी माफी मागावी, अशी मागणी गेले काही दिवस केली जात होती. 

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, "व्यंग्यचित्रातून कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. शिवराय हे आपले दैवत आहे. बाळासाहेबांच्या शिकवणीतून तयार झालेला कोणताही शिवसैनिक माता-भगिनींचा अपमान करणे शक्‍य नाही. त्या व्यंग्यचित्रातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो. या वादानंतर मुद्दाम मी पाच दिवसांनंतर पत्रकार परिषद घेतली. राजकारणातून बाहेर फेकल्या गेलेल्यांनी या मधल्या काळात शिवसेनेला लक्ष्य करून आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. अशा धमक्‍यांसमोर शिवसेना कधीही झुकणार नाही.‘‘ 

मराठा समाजाच्या मागण्यांविषयी विधानसभेचे एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीचाही उद्धव यांनी यावेळी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, "मराठा समाज त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यात कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेचा संबंध आहे, आरक्षणाचा विषय आहे आणि ऍट्रॉसिटीचाही मुद्दा आहे. यावर आतापर्यंत अनेक नेते बोलले आहेत. पण विधानसभेबाहेर बोलताना केलेल्या विधानांना फारसा अर्थ नसतो. या विषयांवरील चर्चेस फाटे फुटू नयेत, म्हणून एका दिवसाचे अधिवेशन बोलाविण्याची लेखी मागणी शिवसेनेने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या अधिवेशनामध्ये प्रत्येक पक्षाने या मुद्यांवर आपापली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मराठा आरक्षणाची कालमर्यादाही स्पष्ट केली पाहिजे.‘‘ 

उद्धव ठाकरे म्हणाले.. 

  • व्यंग्यचित्रातून समाजाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. 
  • मोठ्या मुश्‍किलीने हिंदूंमधील एकजूट होत आहे. मराठा समाजात एकजूट झाली आहे. 
  • जो भगवा आमच्या हातात आहे, तोच त्यांच्याही हातात आहे. ती आपलीच माणसे आहेत. 
  • आजवर त्यांच्या (राजकीय नेते) कारभारामुळे नाडली गेलेली जनता रस्त्यावर उतरली आहे. 
  • शिवसेनेच्या अंगावर येणाऱ्या राजकीय नेत्यांचा समाचार दसरा मेळाव्यात घेणार 
  • मराठा क्रांती मोर्चांमध्ये राजकीय नेत्यांना दूर ठेवले आहे. ही भूमिका योग्य आहे. कारण याच नेत्यांनी इतकी वर्षे समाजाला झुलवत ठेवले आहे.
  • मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न राज्यातील जनतेनेच हाणून पाडले आहेत.
Web Title: Uddhav Thackray apologize on Cartoon controversy