मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्कवसुली 

तेजस वाघमारे
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - सायन-कोळीवाडा येथील जीएनव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा एक ते दीड लाखांचे अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत समाज कल्याण विभागाने महाविद्यालय प्रशासनाकडून खुलासा मागवला; मात्र महाविद्यालयाने समाधानकारक उत्तर न दिल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठाकडून मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे शिक्षण शुल्क वसूल करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला जातो. त्यानंतरही अनेक महाविद्यालये आदेशांना केराची टोपली दाखवत जबरदस्ती विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करतात. केंद्र सरकारमार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी अनुसूचित जाती तसेच जमाती, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. राज्याच्या सामाजकल्याण विभागामार्फत महाविद्यालयांना विद्यापीठाने निश्‍चित केलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. तरीही अनेक शिक्षण संस्था मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क वसूल करतात. असाच प्रकार सायन-कोळीवाडा येथील जीएनव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये उघडकीस आला आहे. 

याप्रकरणी संस्थाचालकांवर फौजदारी व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनविसेचे उपाध्यक्ष ऍड. संतोष धोत्रे यांनी निवेदनाद्वारे समाज कल्याण विभागाला दिला आहे. समाज कल्याण विभागाच्या मुंबई शहर सहायक आयुक्तांनी महाविद्यालयाला खुलासा करण्याचे आदेश दिले. त्यावर महाविद्यालयाने दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने कारवाईचे संकेत देण्यात आले. 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार देत नसल्यास ते विद्यार्थ्यांकडून घ्यावे, असा विद्यापीठाचा नियम असल्याचे उत्तर महाविद्यालयाने दिले आहे. हे उत्तर असमाधानकारक आहे. त्यामुळे महाविद्यालयाची चौकशी केली जाणार आहे. याचा अहवाल येताच कारवाईचा विचार केला जाईल. 
- प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग 

Web Title: Unauthorized charge from backward class students