'मुख्यमंत्र्यांचा विजय असो': कर्जमाफीवरून विधानपरिषद तहकूब

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

राज्यपालांच्या अभिभाषणावर आज चर्चा सुरू करावी असे सभापतींनी सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणाला सेनेचा पाठिंबा आहे का हे आधी समजू दया.

- धनंजय मुंडे

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बुधवारी विधान परिषदेचे कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.  
सुरवातीला सभागृहनेते चंद्रकांतदादा पाटील यांनी सभागृहात प्रवेश करताच विरोधी बाकांवरून 'मुख्यमंत्र्यांचा विजय असो' असे दादांना संबोधून टोलेबाजी करण्यात आली. 

सुरवातीच्या टोलेबाजीनंतर आज कामकाज सुरळीत चालेल असे वाटत होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, शिवसेना सत्तेत असताना विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वेलमध्ये उतरून आंदोलन करत आहे. 
राज्यपालांच्या अभिभाषणावर आज चर्चा सुरू करावी असे सभापतींनी सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणाला सेनेचा पाठिंबा आहे का हे आधी समजू दया. त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफीचा निर्णय सरकार जाहीर करत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला. 

सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी हा सरकारचा विचार आहे. आता लगेच हा निर्णय घेता येणार नाही. यावर विरोधी सदस्य आक्रमक झाले. एकूण राज्य सरकारच्या विरोधात गोंधळ व जोरदार घोषणाबाजी झाल्याने विधान परिषद आज चारवेळा तहकूब करावी लागली.
 

Web Title: vidhan parishad adjourned over farmers loan waiver demand