सलग 11 व्या दिवशीही विधान परिषद ठप्प

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई - शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विधानसभा सदस्यांच्या निलंबनावरून गुरुवारी सलग अकराव्या दिवशी विरोधकांनी कामकाज रोखून धरले. सभागृह सुरू होताच "दादागिरी नहीं चलेगी' अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडल्याने उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अर्ध्या मिनिटातच कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

राज्याचा 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाला खरा; पण अद्याप त्यावर ना चर्चा झाली, ना तो मंजूर झाला. परिषदेच्या आजच्या कार्यक्रम पत्रिकेत तारांकित प्रश्नोत्तरे, अशासकीय विधेयके, 93 च्या सूचना, लक्षवेधी, सुधारणा विधेयके, सभागृह नेत्यांचे प्रस्ताव, विशेष उल्लेख, अर्धा तास चर्चा असे कामकाज होते. सभागृहाची बैठक आज दुपारी बारा वाजता सुरू झाली. उपसभापती माणिकराव ठाकरे त्यांच्या आसनाजवळ येताच विरोधी बाकावरील सदस्य मोकळ्या जागेत आले आणि घोषणा देऊ लागले. या वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, विधानसभेच्या 19 निलंबित सदस्यांचे निलंबन मागे घ्या, अशा विरोधी सदस्यांच्या घोषणा होत्या. त्यांच्या घोषणा पाहून उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शुक्रवार (ता. 24) दुपारपर्यंत सभागृह तहकूब केले.

दरम्यान, विधान परिषदेचे कामकाज सुरळीत चालावे याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे; मात्र सत्ताधारी ही कोंडी फुटावी, यासाठी काहीच प्रयत्न करीत नसल्याची नाराजी व्यक्त करीत विधान परिषदेचे आमदार सभागृहाबाहेर चर्चा करीत होते.