असं गाव सुरेख...विकासात प्रगत!

असं गाव सुरेख...विकासात प्रगत!

दुष्काळी महूद झाले पाण्यासाठी स्वयंपूर्ण
सोलापूर -
 दुष्काळी सांगोला तालुक्‍यातील पाण्यासाठी भटकंती करणारे गाव महूद शेती अन्‌ पिण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. जलयुक्त शिवारमधून केलेल्या कासाळ ओढ्याच्या पुनरुज्जीवनातून ही समृद्धी आली. १८ हजार लोकसंख्येसह शेतीची तहान भागवण्यासाठी गावाने एकोपा दाखवला. जवाहरलाला नेहरू पोर्ट ट्रस्टचा आर्ट ऑफ लीव्हिंगच्या माध्यमातून मिळालेला निधी अन्‌ लोकवर्गणीतून ओढ्यातील २ लाख ४० हजार घनमीटर गाळ उपसण्यात आला. गावातील २५० एकर क्षेत्र सिंचनाखाली आले. २ हजार ८५० हेक्‍टरवर कंपार्टमेंट बंडिंगची कामे झाली. आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी या कामाबद्दल ग्रामस्थांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. या गावापासून प्रेरणी घेत कटफळच्या ग्रामस्थांनीही लोकसहभागातून याच ओढ्याचे ३ किलोमीटरचे पुनरुज्जीवन केले. आता ४२ किलोमीटरच्या ओढ्याच्या पुनरुज्जीवनासाठी ११ गावांतील ग्रामस्थ पुढे आले आहेत. 

मांडवडच्या वाडीचे झाले लक्ष्मीनगर
नाशिक -
 मांडवडची (ता. नांदगाव) वाडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेराशे लोकसंख्येच्या गावाने गेल्या २० वर्षांमध्ये कोरडवाहू शेती ते बागायती शेती, असा अर्थपूर्ण प्रवास करून गावाचे नाव लक्ष्मीनगर असे सार्थ ठरविले आहे. नांदगाव दुष्काळी तालुक्‍यातील या गावाजवळ शाकंबरी नदीवर १९९५ मध्ये बंधारा बांधण्यात आला. मुबलक पाण्यामुळे उसाची शेती सुरू केली. पण बंधाऱ्याखालील गावांनीही पाण्यावर हक्क सांगण्यास सुरवात केल्याने पाणी काही प्रमाणात कमी झाले. त्यामुळे शेतकरी उसाऐवजी कांदा पिकाकडे वळाले. कांद्याच्या अस्थिर भावामुळे शेतकऱ्यांनी डाळिंबाकडे मोर्चा वळवला. या लक्ष्मीनगरमध्ये २००५ पासून डाळिंब बागांनी गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला.

भाजीपाल्याच्या निर्यातीतून प्रगती
जळगाव ः
खानदेशातील दहिवेल (जि. धुळे) गावासह परिसरातील अन्य गावांनी भाजीपाला शेती विकसित करुन बेरोजगारीतून मुक्तीचा मंत्र समाजाला दिला आहे. बहुतांश आदिवासी गावे असलेला साक्री तालुका. सुजलॉन कंपनीने पवनऊर्जा प्रकल्प प्रकल्प सुरू केला आणि या तालुक्‍यातील काही भाग गेल्या काही वर्षांत चर्चेत आला. याच तालुक्‍यातील दहिवेल व परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी बदल घडवून आणला. गेल्या काही दिवसांत ‘दहिवेल पट्टा’ बेरोजगारमुक्त भाग म्हणून गणला जात आहे. 

अत्याळकरांनी विस्तारला नेत्रदानाचा परीघ
गडहिंग्लज (कोल्हापूर) ः
अत्याळ ग्रामस्थांनी राजकीय गटतट बाजूला ठेवून मरणोत्तर नेत्रदान चळवळ उभारली. हे काम एकाच गावापर्यंत मर्यादित न ठेवता चार वर्षांत त्याचा आजूबाजूच्या सहा गावांपर्यंत परीघ विस्तारला. आतापर्यंत ३० व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. यातून समाजाला नवी दृष्टी मिळाली. या गावाने १९७२ मध्ये ‘एक गाव एक पाणवठा’ उपक्रम राबवत अस्पृश्‍यता निवारणाचे बक्षीस मिळविले. चार वर्षांपूर्वी मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा क्रांतिकारक निर्णय घेतला. अंकुर आय हॉस्पिटलचे डॉ. सदानंद पाटणे यांचे मोलाचे सहकार्य मिळते.

मुख्यमंत्र्यांचे फेटरी ‘स्मार्ट व्हिलेज’च्या दिशेने
नागपूर ः
काटोल मार्गावरील फेटरी (ता. कळमेश्‍वर) हे २ हजार ५५९ लोकसंख्येचे गाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे गाव गतवर्षी दत्तक घेतले. ‘मेरे सपनों का फेटरी’ असा संकल्प करून या गावाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. जागतिक दर्जाचे ‘स्मॉर्ट व्हिलेज’ म्हणून विकास करण्याचा त्यांचा ध्यास आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या दर महिन्याला भेट देतात. सांडपाण्याच्या शास्त्रशुद्ध निचऱ्यासाठी ‘नेरी’ला प्रकल्प अहवाल करत आहे. वर्धामधील लोकोपयोगी विज्ञान केंद्राचे शौचालय ‘मॉडेल’ वापरले जाते. दीड एकरावर स्मार्ट स्कूल, स्मशानभूमी आणि इतर कामे होणार आहेत. ७ एकरांवर मैदान तयार करण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी वेकोलिचे शशांक कुलकर्णी यांनी दोन टाटा टिप्पर, चार गार्बोज कंटेनर दिलेत. गेसन्स फॅशन मॉलचे मालक रवी अग्रवाल यांनी स्मशानभूमीमध्ये शोक सभामंडपासाठी निधी दिला. डिजिटल स्कूलसाठी सेंट झेव्हियर्स आणि इंटरनॅशनल रेर्यानचे व्यवस्थापन निशीत विजियन यांनी सहकार्य केले.

एसटीने लाखेफळात वाहू लागली विकासगंगा
नगर ः
राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अशोक जाधव यांच्यामुळे पाच महिन्यांपूर्वी बस सुरू केली अन्‌ लाखेफळ गावात विकासाची गंगा वाहू लागली. मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधींनी गावात प्रवेश केला. दुर्गम गावात जाण्यासाठी असलेल्या खडीच्या कच्च्या रस्त्याने विकास पोचणे कठीण बनले होते. सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी पाठपुरावा करत वर्षापूर्वी गावात ग्रामसडक योजनेतून डांबरी रस्ता आणला. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा मार्ग सुलभ झाला. गावात एसटी येताच ग्रामस्थांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. चालक एम. डी. महाशिकारे आणि वाहक बी. डी. गरड यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

कडकनाथ कोंबडीने बदलले अर्थकारण
उस्मानाबाद ः
शिंदेवाडी गावातील अर्थकारण गेल्या दोन वर्षांत कडकनाथ कोंबडीपालनामुळे बदलले आहे. कडकनाथ कोंबडी, अंडी विक्रीतून गावात वार्षिक उलाढाल अर्धा कोटींपर्यंत पोचली आहे. या व्यवसायातून काहींना घरबसल्या रोजगार मिळाला आहे. सारोळा (बुद्रुक) ग्रामपंचायतीअंतर्गत हे गाव आहे. रोजगारासाठी इतरत्र जावे लागते. अशा स्थितीत नितीन शिंदे या तरुणाने तीन वर्षांपूर्वी कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. 

ऊसवाले शेणोलीकर बनले निर्यातदार  
रेठरे बुद्रुक (सातारा) ः
शेणोली (ता. कऱ्हाड) हे मोठ्या बाजारपेठेचे गाव उसाचे आगर म्हणून ओळखले जाते. अलीकडे गावातील शेतकरी उसाबरोबरच पीकपद्धतीत बदल करताहेत. कृष्णाकाठच्या गावात विविध फळे, पालेभाज्यांची लागवड सुरू झाली आहे. डोंगरपायथ्यामुळे पूर्वी बहुतांश शेती कोरडवाहू होती. शेतकऱ्यांनी गावापासून सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील कृष्णा नदीवरून वैयक्तिक खर्चातून सुमारे २० पाणी योजना शेतावर आणून कोरडवाहू शेती बागायतखाली आणण्याची किमया केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com