#VoteTrendLive पार्लमेंट ते पालिका, 'कमळा'ची मालिका!

टीम ईसकाळ
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

1. मुंबई : शिवसेनेने करुन दाखविलं!
2. पुणे : 'कमळ' फुलले; 'घड्याळ' बंद
3. नाशिक : 'इंजिन' फेल
4. पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी-भाजपमध्ये टक्कर
5. नागपूर : भाजपची सरशी
6. ठाणे : शिवसेना आघाडीवर
7. सोलापूर : भाजप आघाडीवर
8. अकोला : भाजपची मुसंडी
9. उल्हासनगर : भाजप-शिवसेनेत चुरस
10. अमरावती : भाजपची आघाडी

महापालिका निवडणुकांमध्ये केंद्र आणि राज्यामध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही मतदारांवर यशस्वीपणे प्रभाव पाडत 'मिनी विधानसभे'तही सत्तेचा सोपान हस्तगत केल्याचे स्पष्ट चित्र आहे.
'पार्लमेंट ते पालिका' एकाच पक्षाच्या हाती सूत्रं देण्याचं आवाहन भाजपने प्रचारादरम्यान केलं होतं. त्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. 

 1. मुंबई : शिवसेनेने करून दाखविलं!
शिवसेनेने भाजपबरोबर युती मोडल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार शिवसेना 84 जागांवर आघाडीवर असून भाजप 81 जागांवर आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनुक्रमे 31 आणि 9 जागांवर आघाडीवर आहे. 

दरम्यान, भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. भाजपने 81 जागांवर विजय मिळवला असून, चार अपक्षांसह सर्वाधिक 85 जागा जिंकल्याचा दावा शेलार यांनी केला. मुंबईतील एकूण 227 पैकी 226 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यापैकी शिवसेनेला 84, भाजप 81, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7, एमआयएम 3 , सपा 6, अखिल भारतीय सेनेला एक अशा जागा मिळाल्या असून अपक्ष 4, निवडून आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक मात्तबरांना मतदारांनी "औकात' दाखविली आहे. माजी आमदार मंगेश सांगळे, विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा, माजी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार, खासदार राहुळ शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे अशा अनेक दिग्गजांना पराभवाची "चव चाखावी' लागली.

शिवसेना आणि भाजप युती तोडण्यात भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत आशिष शेलारांना पराभूत करण्याचा "विडा' शिवसैनिकांनी उचलला होता. मात्र यात त्यांना यश आले नाही. आशिष शेलार वांद्रयातून आमदार म्हणून निवडून आले. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शेलारांचा हिशेब चुकता करण्याची आयतीच संधी विनोद शेलरांच्या रुपात शिवसैनिकांना चालून आली. या संधीचा पुरेपुर फायदा घेत शिवसैनिकांनी घेतला. प्रभाग क्रमांक 51 मधून भाजपच्या तिकीटावर लढणारे शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांच्या पराभवाचे हेच कारण आहे. एकूण 13 उमेदवार असलेल्या या प्रभागातून शिवसेनेचे स्वप्नील टेंबवलकर हे विजयी झाले आहेत. पालिकेचे शिक्षण समितीचे अध्यक्षपद उपभोगलेल्या विनोद शेलार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला "सोडचिठ्‌ठी' देत "भाजपवासी' झालेल्या मंगेश सांगळे यांनाही मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. 2017 च्या निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर सांगळे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत विक्रोळी परिसरातून आमदार म्हणून सांगळे थेट विधानसभेत दाखल झाले. चांगल्या कामामुळे "आदर्श आमदार' म्हणून त्यांचा गौरवही करण्यात आला. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी पडल्यावर सांगळेंनी मनसेला "रामराम' करत भाजपच्या तंबूत "एन्ट्री' केली. भाजपनेही त्यांचे स्वगत करत त्यांना विक्रोळीच्या 118 क्रमांकाच्या प्रभागातून पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. सत्तेसाठी पक्ष सोडलेल्या सांगळेंना मात्र याही वेळेस पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 15 उमेदवार रिंगणात असलेल्या या प्रभागात शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होती. या लढतीत शिवसेनेचे उपेंद्र सावंत यांनी बाजी मारली. कट्टर शिवसैनिक म्हणून नावाजलेले नगरसेवक नाना आंबोले यांनी ऐन निवडणुकीत भाजपत प्रवेश केला.आंबोले यांच्या पत्नी तेजस्विनी आंबोले यांना 203 क्रमांकाच्या प्रभागातून भाजपने उमेदवारी देऊ केली. मात्र, पक्षांतर करुनही तेजस्विनी आंबोले यांना विजय मिळविता आला नाही. इथून शिवसेनेच्या सिंधु मसुरकर विजयी झाल्या.

प्रचारादरम्यान भाजपच्या आरोपांना चोख उत्तर देण्यासाठी शिवसेनेने खासदार राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली होती. पालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाचा दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या शेवाळेंनी भाजपवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र, दुर्दैवाने आपल्या पत्नी कामिनी शेवाळे यांना निवडून आणण्यात शेवाळे अपयशी ठरले. मानखुर्दच्या 144 क्रमांकाच्या प्रभागातून लढणाऱ्या कामिनी शेवाळे यांना भाजपच्या अनिता पांचाळ यांनी पराभूत केले आहे. खासदार राहुल शेवाले यांच्यासाठी हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल.

उच्चपदस्थ सरकारी नोकरी सोडून स्वप्ना संदीप देशपांडे या प्रभाग क्रमांक 191 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. मनसेचे माजी गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी असलेल्या स्वप्ना देशपांडे यांची दादर प्रभागातील लढत मनसेने प्रतिष्ठेची केली होती. गेल्या निवडणुकांमध्ये मनसेने दादर प्रभागात वर्चस्व राखले होते. मात्र यंदा मनसेला इतिहासाची "पुनरावृत्ती' करता आली नाही. शिवसेनेच्या माजी महापौर विशाखा राऊत यांनी देशपांडे यांना पराभवाची धूळ चारली. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांना 132 क्रमांकाच्या प्रभागातून मुंबईतील सर्वांत श्रीमंत उमेदवार पराग शहा यांनी आव्हान दिले होते. निवडणुकांचा दांडगा अनुभव पाठीशी असलेले छेडा या प्रभागातून पराभूत झाले. भाजपच्या पराग शहा यांनी इथे "जाएंट किलर'ची भूमिका बजावली. शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांना प्रभाग क्रमांक 60 मधून पराभवाला सामोरे जावे लागले. तर प्रभाग क्रमांक 9 मधून माजी उपमहापौर मोहन मिठबावकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांनाही प्रभाग क्रमांक 11 मधून पराभव स्वीकारावा लागला.

2. पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला दे धक्का
पुणे- सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा जबरदस्त धक्का देत भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिकेमध्ये कमळ फुलविले. भारतीय जनता पक्षाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गड उद्‌ध्वस्त करण्याच्या दिशेने जोरदार आगेकूच केली आहे. अर्थात, भाजपला सत्तेवर येण्यासाठी युतीतील शिवसेना या पारंपरिक मित्राची गरज लागेल का, एवढाच प्रश्‍न बाकी होता. मात्र याबाबतचे अधिकृत चित्र संपूर्ण मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ आणि मुरब्बी नगरसेवकांना पराभवाची चव भाजपच्या अनेक नवख्या आणि आतापर्यंत फारशी माहिती नसलेल्या भाजपच्या उमेदवारांनी चाखायला लावली. एकूण ४१ प्रभागांतील १६२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणी पुण्यात सकाळी अकरा मतमोजणी केंद्रांवर सुरू झाली आणि पहिल्या दीड ते दोन तासांतच जवळपास निम्म्या जागांचे कल स्पष्ट झाले. त्या निम्म्या जागांपैकी जवळपास निम्म्या जागा भाजपने पटकावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची पीछेहाट झाली असून, एकेकाळचा सत्ताधारी काँग्रेस दोन आकडी संख्या गाठण्यासाठीही धडपड करीत असल्याचे चित्र होते. शिवसेनेने मात्र काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली.
दुपारी चार वाजेपर्यंतची आकडेवारी-
शिवसेना-10
भाजप- 77
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी- 44
मनसे- 6
इतर- 5

3. नाशिक : 'इंजिन'चा तुटला ट्रॅक; कमळ फुलले झाक! 

नाशिक : ज्या महानगरपालिकेत वर्चस्व गाजवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली प्रतिष्ठा कायम ठेवली होती. तेथेच पक्षाची वाताहात झाली असून मनसेच्या "इंजिना'चा ट्रॅक तुटला असून त्याच "ट्रॅक'वर कमळ फुलले आहे. 

आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भारतीय जनता पक्षाला 51, शिवसेनेला 33, काँग्रेसला 6, मनसेला 3 तर इतर पक्षांना 5 जागा मिळाल्या आहेत. अनेक ठिकाणी मतदारांनी पॅनलला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 1, 4, 20 मध्ये भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. तर प्रभाग क्रमांक आठमधील चारही उमेदवार निवडून आणण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील दोन जागांवर काँग्रेसला यश मिळाले आहे. तर याच प्रभागातील एका जागेवर मनसेला विजय मिळाला आहे. 

खासदार हेमंत गोडसे आणि खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या पुत्रांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विजयी उमेदवार आज शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा करत असल्याचे चित्र दिसत आहे. तर मतमोजणी केंद्रांवर कल विरुद्ध बाजूने गेल्याने अनेक उमेदवारांनी केंद्र सोडून निघून गेल्याचेही आढळून आले आहे. माजी महापौर यतीन वाघ यांच्यासह राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, नगरसेवक उत्तम दोंदे, माधुरी जाधव यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 
धक्कादायक पराभव 
- शिवसेनेचे माजी महापौर यतीन वाघ 
- राष्ट्रवादीच्या कविता कर्डक 
- शिवसेनेच्या तनुजा घोलप 
- मनसेचे अनिल मटाले 

4. पिंपरी चिंचवड : भाजपची मुसंडी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीवार्दाने भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला निर्माण केलेले तगडे आव्हान बऱ्यापैकी कामी आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावरच आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दुपारी तीनपर्यंत हाती आलेल्या निकालामधून भाजपने तीन जागांवरून थेट ३० जागांपर्यंत मुसंडी मारल्याचे चित्र आहे. 

राष्ट्रवादीचे उमेदवार २२ ठिकाणी आघाडीवर होते. दरम्यान, ५० जागांचा आकडा ओलांडू, असा आत्मविश्‍वास आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही अत्यंत कडवी झुंज दिली आहे. शिवसेनेची अपेक्षित कामगिरी मात्र दिसली नाही. काँग्रेस, मनसे, एमआयएम यांना आपले साधे खातेही उघडता आले नाही. १२८ पैकी भोसरी प्रभाग क्रमांक ६(क) मधून भाजपचे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे १२७ जागांवर निवडणूक झाली. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हॅटट्रिक करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.
दुपारी चार वाजेपर्यंतची आकडेवारी-
शिवसेना-6
भाजप-28
काँग्रेस-0
राष्ट्रवादी-18
मनसे-0
इतर-1

5. नागपूर : भाजपने गड राखला
मुख्यमंत्र्यांचे होम ग्राऊंड आणि संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर महापालिकेत भाजपने गड राखला आहे. सत्तेत सहभागी असताना भाजपला कडवे आव्हान देत मुख्यमंत्र्यांची नाचक्की करण्याचा विडा उचलेल्या शिवसेनेला मात्र येथे खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादीचे आमदार गजभिये यांच्या स्वतःच्या पत्नी येथून पराभूत झाल्या आहेत. 
चार वाजेपर्यंत 
भाजप- 58, 
काँग्रेस- 19, 
राष्ट्रवादी- 1, 
अपक्ष- 4

6. ठाणे शिवसेनेचे! 
शिवसेना आणि भाजपमधील चुरशीच्या लढतीमुळे लक्ष वेधले गेलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी संथपणे सुरू झाली. अपेक्षेनुसार शिवसेनेने ठाण्यात मजबूत पकड मिळविली आहे. आतापर्यंत आलेल्या 99 निकालांपैकी 51 जागांमध्ये शिवसेनेला विजय मिळाला आहे. 

शिवसेनेने सुरवातीपासूनच ठाण्यात आघाडी घेतली. दिवा पॅनेलमध्ये राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या, तर एक जागा मनसेच्या पार्वत्री म्हात्रे यांनी जिंकली, तर प्रभाग क्रमांक 27 मधून शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी बाजी मारली. या प्रभागात शिवसेनेच्या शैलेश पाटील, अंकिता पाटील, दिपाली भगत आणि अमर पाटील यांनी विजय मिळविला. राष्ट्रवादीला 26 जागांवर आघाडी मिळाली आहे.
शिवसेनेसमोर प्रचारात कडवे आव्हान उभे करणाऱ्या भाजपला आतापर्यंत 17 जागांवर आघाडी मिळाली आहे. 

7. सोलापूर महापालिकेत भाजपची घोडदौड
सोलापूर : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार ५२ जागांवर विजय संपादन केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी पानिपत केले आहे. शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी 16 जागा  पटकावत दुसऱया स्थानावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने चार, बसपने चार, तर माकपने एका जागेवर विजय संपादन केला आहे. एमआयएमने तीन जागा जिंकत महापालिकेत काँग्रेसच्या उमेदवार व विद्यमान महापौर प्रा. सुशीला आबुटे या पराभूत झाल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार तथा विद्यमान उपमहापौर प्रवीण डोंगरेही पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, तर महापालिकेचे सभागृह नेते काँग्रेसचे संजय हेमगड्डी, माजी महापौर आरीफ शेख यांना पराभूत व्हावे लागले आहे.

काँग्रेसला धक्का
काँग्रेसने प्रभाग 16 मधुन विजयाचे खाते खोलले असून या ठिकाणी फिरदोस पटेल विजयी झाल्या आहेत. मात्र, महापालिकेचे सभागृह नेते काँग्रेसचे संजय हेमगड्डी यांना पराभूत व्हावे लागले आहे. प्रभाग 20 मध्ये काँग्रेसचे पॅनल विजयी झाले आहे. बाबा मिस्त्री, परवीन ईनामदार, अनुराधा काटकर व प्रवीण निकाळजे या ठिकाणी विजयी झाले आहेत. प्रभाग 15 काँग्रेसचे पॅनल विजयी झाले आहे. श्रीदेवी फुलारे, चेतन नरोटे, वैष्णवी करगुळे, विनोद भोसले विजयी झाले आहेत. याठिकाणी पूर्वीचे काॅग्रेसचे नेते, माजी महापौर व निवडणुकीच्या तोंडावर भाजपात गेलेले अरिफ शेख पराभूत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शेख यांना भाजपात घेऊन उमेदवारी दिली होती. 

राष्ट्रवादीला फटका
राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसन जाधव, नागेश गायकवाड आणि सुवर्णा जाधव यांनीन प्रभाग 22 मधून विजय मिळवला. याच प्रभागातून एमआयएमच्या पुनम बनसोडे विजयी झाल्या आहेत.

8. अकोला : भाजपची मुसंडी
कॉग्रेस पक्षाचे वर्चस्व असलेल्या अकोला महापालिकेत यंदा भारतीय जनता पक्षाने सद्यस्थितीत 64 पैकी 42 जागांवर विजय मिळविला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा 
भाजप: 42, काँग्रेस:12, भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप)-बहुजन महासंघ (बमसं):3, शिवसेना : 7, राष्ट्रवादी:5,अपक्ष:2 तर एमआयएम आणि एक जागेवर विजयी ठरले. 
काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांच्या पदरी निराशा आली असून अकोल्यात भाजपचे कमळ फुलण्याची शक्‍यता आता आणखी बळावत आहे.अकोल्यात आता 
दुपारी चार पर्यंत भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे आहेत. 

9. उल्हासनगर : भाजपचे सेनेला आव्हान
उल्हासनगर महापालिकेतही भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसमोर आव्हान निर्माण केले. दुपारी चार वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, शेवटच्या फेरीत भाजपने 34 जागांवर आघाडी घेतली आहे. शिवसेनेने 25 जागांवर आघाडीवर घेतली आहे तर साई पक्षाला 8 जागांवर आघाडी प्राप्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवर विजय मिळविला असून रिपब्लिकन पार्टीच्या पारड्यात 2 जागा पडल्या आहेत. दिवसभरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत चुरशीची सुरु आहे. बहुतांश जागांवर या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी यश मिळविले आहे. 

10. अमरावतीत फुलले कमळ 

अमरावती : काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या अमरावती महानगरपलिकेत कमळाने कमाल केली असून आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपला 37 जागांवर यश मिळाले. मागील निवडणुकीत भाजपला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले होते. तर एकूण 87 जागांपैकी 25 जागांवर काँग्रेसला यश मिळाले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र असून काँग्रेसला केवळ 6 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर शिवसेना चार जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या महापौरांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.