प्रशिक्षणानंतरही नोकरीची प्रतीक्षाच

Job
Job

मुंबई - कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे २९ लाख प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले; परंतु जितक्‍या तुलनेत हे प्रशिक्षण दिले गेले, तितक्‍या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध झाली नाही. म्हणजे कौशल्य मिळाल्यानंतरही सुमारे ५० टक्‍क्‍यांहून अधिक उमेदवार बेरोजगारच आहेत. 

प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेत ज्या संस्थांमध्ये बेरोजगारांनी विविध ६२९ अभ्यासक्रम विकसित केले आहेत, त्या संस्थांना दिले जाणारे मानधनही उमेदवारांना नोकरी लागली तरच पूर्ण मिळत असल्याने गैरव्यवहाराला चाप बसला असला तरी, कौशल्य मिळवूनही हाती काही लागत नसल्याचे दिसून येत आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत बेरोजगारांना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण देऊन कुशल बनविण्याचा निर्णय सरकारने २०१७ मध्ये घेतला. त्यासाठी सहाशे तासांत कौशल्य विकसित करण्याचे अभ्यासक्रम सुरू केले; परंतु यातील बहुतेक प्रशिक्षण हे प्राथमिक औद्योगिक ज्ञानावर तसेच ब्यूटीपार्लर, केशकर्तनालय एवढ्यापुरतचे मर्यादित राहिल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही. उद्योगांना आवश्‍यक असणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी या योजनेचा उपयोग व्हावा, असा हेतू असतानाही त्याचा लाभ पुरेशा प्रमाणात होत नसल्याचे अधिकारी खासगीत मान्य करतात. माहिती अधिकारात उपलब्ध झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार राज्यात ही योजना सुरू झाल्यापासून २९ लाख प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतले; परंतु सद्यःस्थितीला सुमारे १० लाख ९८ हजार ७८९ प्रशिक्षणार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. एका विद्यार्थ्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रतितास साडेबत्तीस रुपये एवढी रक्कम दिली जाते. ही रक्कम प्रशिक्षणाला सुरवात झाल्यानंतर ३० टक्के, प्रशिक्षणार्थी उतीर्ण झाल्यानंतर तेवढीच रक्कम दिली जाते. कौशल्य मिळवूनही नोकरी मिळत नसेल, तर प्रशिक्षित करणाऱ्या संस्थेची ४० टक्के रक्कम दिली जात नाही. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. कौशल्य देणाऱ्या योजनांमध्येही चांगला प्रतिसाद असल्याचे सांगण्यात येते. मात्र, निवडण्यात आलेले अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष लागणारी मनुष्यबळाची गरज यात कमालीची तफावत योजनेत पारदर्शकता आणूनही त्याचा फारसा लाभ मिळत नसल्याचे चित्र दिसून येते. प्रशिक्षणार्थींमध्ये महिला प्रशिक्षणार्थींची संख्याही अधिक पाहायला मिळत आहे. कौटुंबिक जबाबदारी असल्याने, शिक्षण अर्धवट सोडायला लागलेल्या महिला-मुलींचा यात अधिक समावेश आहे. घरकाम सांभाळून करता येतील अशा प्रशिक्षणाकडे महिलांचा सर्वाधिक कल आहे.

गार्मेंट, फॅशन डिझायनिंग तसेच ब्यूटी थेरपी ॲण्ड हेअर ड्रेसिंग या क्षेत्राला मागणी जास्त आहे. राज्यात सुमारे १३ लाख महिला-मुलींनी हे प्रशिक्षण घेतले आहे, तर पुरुष प्रशिक्षणार्थींचा सर्वाधिक कल हा इन्फॉर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्‍नॉलॉजी, बॅंकिंग या क्षेत्राकडे आहे. मात्र, नोकरीच्या तुलनेत महिलांची पुरुषांच्या तुलनेत आघाडी आहे. प्रशिक्षणार्थींच्या तुलनेत सात टक्के महिलांनी स्वतःचा लहानसा व्यवसाय घरगुती पातळीवर सुरू केला आहे. प्रशिक्षणार्थी पुरुष कंपनीतच नोकरी हवी, या आशेपायी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

योजनेचा उद्देश व रोजगार क्षेत्रे
राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या रुचीच्या क्षेत्रांत कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. राष्ट्रीय पातळीवर रोजगाराची अधिकतम संधी असलेली क्षेत्रे कौशल्य विकासासाठी प्राधान्य क्षेत्रे म्हणून निवडण्यात आली आहेत. यात बांधकाम, उत्पादन व निर्माण, वस्त्रोद्योग, ऑटोमोटिव्ह, आतिथ्य, आरोग्य देखभाल, बॅंकिंग, वित्त व विमा, संघटित किरकोळ विक्री, औषधोत्पादन व रसायने, माहिती तंत्रज्ञान व संलग्न कृषी प्रक्रिया यांचा रोजगार क्षेत्रांत समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com