एक थरार ७४ वर्षांपूर्वीचा... जेल फोडण्याचा...

महादेव अहिर
रविवार, 10 सप्टेंबर 2017

हुतात्मा समूहातर्फे आज शौर्यदिन; नागनाथअण्णांसह स्वातंत्र्यवीरांच्या आठवणींना उजाळा

वाळवा - स्वातंत्र्यासाठी झपाटून कामाला लागलेल्या क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी अटकेत असताना सातारा येथील येरवडा जेल फोडून पलायन केले. या घटनेचा ७४ वा स्मृतिदिन रविवारी (ता.१०) आहे. या दिवसाला हुतात्मा उद्योग समूहात शौर्यदिन म्हणून साजरा केला जाईल. 

हुतात्मा समूहातर्फे आज शौर्यदिन; नागनाथअण्णांसह स्वातंत्र्यवीरांच्या आठवणींना उजाळा

वाळवा - स्वातंत्र्यासाठी झपाटून कामाला लागलेल्या क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी अटकेत असताना सातारा येथील येरवडा जेल फोडून पलायन केले. या घटनेचा ७४ वा स्मृतिदिन रविवारी (ता.१०) आहे. या दिवसाला हुतात्मा उद्योग समूहात शौर्यदिन म्हणून साजरा केला जाईल. 

२९ जुलै १९४४ ला क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी सहकारी स्वातंत्र्यसैनिकांसह येथे बैठकीत व्यस्त होते. बैठकीनंतर कोटभागात तुकानाना देसाई यांच्या घरी  त्यांचा मुक्काम होता. फंदफितुरीने त्याच दिवशी  मध्यरात्री त्यांना ब्रिटिशांनी अटक केली. त्यानंतर जुन्या चावडी कार्यालयात त्यांना ठेवले. त्यावेळी हुतात्मा किसन अहिर, खंडू सखाराम शेळके, राजमती बिरनाळे, क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्यासह शेकडोंचा जमाव ब्रिटिशांवर चालून गेला. जमावाकडून अघटित घडण्याच्या शंकेने नागनाथअण्णांनी स्वतः जमावाला शांत करण्याचे काम केले. जमाव शांत झाल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांना इस्लामपूर येथील तुरुंगात हलवले. मात्र जाताना त्यांनी लवकरच मागे येतोय असे सांगितले. 

राजमती बिरनाळे यांच्यासह इतर स्वातंत्र्यसैनिक अण्णांना सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठीची आखणी सुरू होती. त्याची कुणकुण ब्रिटिशांना लागताच नागनाथअण्णांना सातारा येथे जेलमध्ये हलवले. जेलमध्ये मजबूत बराकीत त्यांना ठेवले. 

वाघासारखे काळीज असणारे अण्णा या बराकीत फार काळ रहायचे नाही, या उद्देशाने धडपडत होते. स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेल्या नागनाथअण्णांना कारागृहाच्या उंच भिंती व ब्रिटिशांच्या बंदुकीच्या गोळ्या रोखू शकल्या नाहीत.  जेल फोडायचा तो पर्यंत पोटात अन्नाचा कण घ्यायचा नाही या प्रतिज्ञेने अण्णा पेटून उठले. जेलमध्ये दोन-तीन दिवस राहिल्यानंतर त्यांनी इतर कैद्यांशी मैत्री जमवली. त्यात कामेरीच्या एस. बी. पाटील, वाटेगावचे बर्डे मास्तर यांचा प्रमुख समावेश होता. जेल फोडताना सापडलो तर गोळीला बळी पडावे लागणार याची त्यांना पूर्ण जाणीव होती मात्र त्यांनी फिकीर केली नाही. चोरीछुपे त्यांनी जेलची रेकी केली. तटाची उंची पडताळली. एका  ठिकाणी भिंत ओलांडणे शक्‍य होते. मात्र त्यासाठी मानवी मनोरा आवश्‍यक होता. तसा करण्याचा निश्‍चय त्यांनी केला. 

अखेर १० सप्टेंबर १९४४ ला पहाटे दैनंदिन विधीसाठी इतर कैद्यांसमवेत अण्णा बाहेर पडले. त्यानंतर निर्धारित ठिकाणी पोहोचले. बलदंड सहकाऱ्यांचा मानवी मनोरा तयार केला. आणि सातारा जेलच्या तटावरून नागनाथअण्णांनी बेभानपणे उडी मारली. उडी मारताच समोर पोलिसांची वसाहत निदर्शनास आली. तरीही ते डगमगले नाहीत. एखाद्या स्थानिकाप्रमाणे हालचाली करत ते तेथून निसटले. सातारा शहराच्या पश्‍चिम बाजूचा रस्ता त्यांनी धरला. सोमवार पेठेत सकाळी सहा वाजता  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घरी ते पोहोचले. मात्र कर्मवीर घरी नव्हते. तेथून काही दिवसांनी ते वाळवा, शिराळा कार्यक्षेत्रात दाखल झाले. पुन्हा ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्याची लढाई नव्या ताकदीने त्यांनी सुरू केली. या घटनेला रविवारी (ता.१०) ७४  वर्षे पूर्ण होत आहेत. नागनाथअण्णांच्या दुर्दम्य, धाडसी आणि पराक्रमी जीवनातील ही घटना सुवर्णाक्षरांनी नोंदलेली आहे. 

स्मृतिस्तंभावर पुष्पांजली
जेल फोडण्याच्या घटनेला शौर्यदिन म्हणून साजरा केला जाईल. त्यासाठी हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रविवारी सातारा जेल मध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिस्तंभावर पुष्पांजली वाहतील. सकाळी दहा वाजता कार्यक्रम आहे.