कॅबिनेट पद मागितलेच नव्हते - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 जुलै 2016

मुंबई - कॅबिनेट दर्जाचे पद मागितलेच नव्हते, त्यामुळे लाचार होण्याचा प्रश्‍नच नसल्याची सारवासारव करायला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरवात केली आहे. शिवसेना सत्तेत सहभागी झाली, तेव्हाच सत्तावाटपाचे सूत्र ठरले होते, त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याची दोन राज्य मंत्रिपदे भरली गेली असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. 

शिवसेनेला अजून एक कॅबिनेट मंत्रिपद मिळण्यापासून दूर ठेवून भाजपने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. केंद्रात मंत्रिपद नाही; निदान राज्यात तरी कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, यासाठी शिवसेना प्रयत्न करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अशा प्रकारच्या टीकेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मात्र आज यावर स्पष्टीकरण दिले. ‘शिवसेनेची बोळवण वगैरे झालेली नाही. तसे असते तर आम्ही स्वाभिमान नक्कीच दाखवला असता,‘‘ असे सांगतानाच, ‘मी शपथविधीला गेलो नाही याचा वेगळा अर्थ काढू नये,‘‘ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे, तसेच ‘शिवसेना सत्तेत सहभागी होऊ नये असे ज्यांना वाटत होते, त्यांनाच आजच्या आमच्या समावेशाने वाईट वाटले असेल,‘‘ अशी चपराक त्यांनी विरोधी पक्षाला लावली आहे. 

राज्य मंत्रिपदाचे अधिकार वाढावेत, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘कॅबिनेट मंत्र्यांचे काही अधिकार राज्यमंत्र्यांना दिले जातील. काही खाती नव्याने जोडली जातील. याबाबत मुख्यमंत्री आपल्याशी बोलतील आणि सगळे काही जाहीर करतील,‘‘ अशीही आशा त्यांनी व्यक्‍त केली.