कडधान्ये का नरमली?

कडधान्ये का नरमली?
कडधान्ये का नरमली?

पावसाळा सुरू होण्यापूर्वी कडधान्य आणि भरडधान्यांचे भाव तेजीत होते. ऑगस्टमध्ये पाऊसमान अनुकूल दिसताच कडधान्यांचे भाव वेगाने खाली आले; पण भरडधान्य मात्र तेजीत राहिले, असे का घडले?

गेल्या दोन वर्षांतील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनुकूल पाऊसमानामुळे यंदा खरीप पिकांचे उत्पादन आणि उत्पादकेत सुधारणा दिसतेय, त्यामुळे बहुतांश पिकांच्या भावात मंदीचा कल दिसत आहे. देशात गेल्या वर्षी ऑगस्टअखेरपर्यंत ९९७ लाख हेक्टरवर पेरा झाला होता. यंदा याच कालावधीत १०३३ लाख हेक्टरवर पेरा झालाय.

शुक्रवारी (ता. २ सप्टेंबर) केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार १४२ लाख हेक्टरवर कडधान्यांचा पेरा झालाय. एकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत ते जवळपास १५ टक्के आहे. एकूण कडधान्यांच्या पेऱ्यात तुरीचा ३६ टक्के वाटा आहे. ५२ लाख हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. उर्वरित क्षेत्रात उडीद ३४ लाख हेक्टर, तर मूग ३२ लाख हेक्टर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर क्षेत्र १६ लाख, उडीद ७.५ लाख तर मूग ८.५ लाख हेक्टरने वाढलेय. तूर क्षेत्र ४६, तर उडीद व मुगाचे क्षेत्र अनुक्रमे २६ आणि ३३ टक्क्यांनी वाढले आहे.

देशातील तुरीचे निम्मे क्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटकात आहे. महाराष्ट्रात यंदा १५ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक वाढ आहे. कर्नाटकातील क्षेत्र तर शंभर टक्क्यांनी वाढून १२ लाख हेक्टरवर पोचले आहे. तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यांतही तूर क्षेत्र वाढले. मूग उत्पादनात राजस्थान अव्वल राज्य आहे. तेथे १५ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांची वाढ आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही पेरा वाढला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर तुरीच्या भावात वेगाने घट झाली. अकोल्यातील भाव नऊ हजारांवरून साडेपाच हजार प्रतिक्विंटलपर्यंत घटले आहेत. उडीद, मसूर, मूग आदींच्या भावातही घट दिसली आहे. बाजार खूप वेगाने खाली आले. याला दोन प्रमुख कारणे आहेत. कडधान्य क्षेत्रातील वाढ आणि साठेबाजांकडून झालेला विक्रीचा जोरदार मारा.

भाव नरमले
कडधान्यासारखीच तेजी मका, बाजरी या भरडधान्यांत यंदा वर्षभर दिसली आहे. मात्र, जयपूर बाजारातील बाजरीचे आणि सांगलीतील मक्याचे भाव अजूनही उच्चांकी पातळीवर आहेत. खास करून मक्याची कापणी - मळणी पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असतानादेखील बाजारभाव उच्चांकी पातळीवर आहेत. यामागील प्रमुख कारण असे, की या दोन्ही पिकांचे शिल्लक साठे नीचांकी पातळीवर असून, बाजाराला त्यात मंदी करायला फारसा वाव नाही. अगदी स्टॉकिस्टनीदेखील मालविक्रीत घाई केली नाही. या पार्श्वभूमीवर, सर्वच कडधान्यांचे भाव ज्या वेगाने खाली आले आहेत, त्यावरून त्यातील कृत्रिम टचांई आणि साठेबाजी लक्षात येते. विशेष म्हणजे तुरीचे पीक बाजारात येण्यास अजून चार महिन्यांचा अवधी असतानाही बाजारात आलेली मंदी बरेच काही सांगून जाते.

यंदा कडधान्यांचा शेतकरी चिंतेत असणे स्वाभाविक आहे. गेली दोन वर्षे उच्चांकी भाव होता; पण त्या प्रमाणात माल विक्रीस नव्हता. यंदा माल आहे; पण किफायती बाजारभाव मिळेल का याबाबत साशंकता आहे. तूर, मूग आणि उडदाला पाच हजारांच्या आसपास चांगला आधार आहे. शिवाय, याच पातळीवर सरकारने हमी भाव जाहीर केला आहे. गेली काही वर्षे कडधान्यांचे भाव हमीभावापेक्षा वरच्या पातळीवर राहत होते. त्यामुळे सरकारला हस्तक्षेपाची गरज भासली नाही. यंदा हमीभावाची अंमलबजावणी करण्याची वेळ येईल, असे दिसते. सराकारी खरेदी प्रभावीपणे झाली तर शेतकऱ्यांसाठी कडधान्ये किफायती ठरतील.

महत्त्वाचा मुद्दा असा, की गेल्या दहा वर्षांपासून कडधान्य उत्पादन जैसे थे आहे. दहा वर्षांनंतर त्यात वाढ दिसत असली तरी त्यामुळे बाजारभाव खूप खाली जातील, अशी परिस्थिती नाही. कडधान्य उत्पादनात यंदा क्षेत्रवाढीनुसार तीस लाख टनांची वाढ गृहीत धरली तरी ती देशांतर्गत गरजेपेक्षा जास्त नाही. बाजारात उत्पादनवाढीच्या बातम्यांमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. उत्पादनवाढीच्या भीतीने जर शेतकऱ्यांनी घाबरून विक्री (पॅनिक सेलिंग) केली तर त्याचा फायदा अर्थातच साठेबाजांना होईल म्हणून कडधांन्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्याकडील माल एकदम न विकता, बाजाराच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने विकण्याची पद्धत अवलंबावी.

-------------------------------------------------------------
मूलभूत तुटवडा आणि कृत्रिम तुटवडा याची ठळक दोन उदाहरणे मका आणि तूर या दोन पिकांतून देता येतील. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन्ही पिकांचे भाव तेजीत होते. पुढे पाऊसमान अनुकूल झाल्याचे दिसताच तुरीचे भाव उतरले; पण मक्याचे भाव सातत्याने तेजीत राहिले. पाऊसमान अनुकूल असले की नफ्याच्या उद्देशाने केलेला स्टॉकमधील माल वेगाने बाहेर येतो. हा माल बाजाराच्या ठराविक काळातील गरजेपेक्षा जास्त ठरला, म्हणून दर उतरले. मक्यात तसे घडले नाही. कारण, मक्याची रोजची गरज आणि पुरवठा यात नवी आवक येईपर्यंत तुटवडा टिकून राहला आहे.
-------------------------------------------------------------
(लेखक शेतमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com