आमदार परिचारक यांना महिला आयोगाचे समन्स

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - जवानांच्या कुटुंबीयांबाबत आक्षेपार्य विधान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना राज्य महिला आयोगाने मंगळवारी समन्स बजावले आहे. परिचारक यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी सैनिकांच्या संघटनेने आयोगाकडे केली असून, आयोगाने या तक्रारीची दखल घेतली आहे.

पंढरपूर येथील एका सभेमध्ये परिचारक यांनी जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा सर्वस्तरांवरून निषेध करण्यात आला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आज भेट घेऊन परिचारक यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. याविषयी रहाटकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले, आयोगाने परिचारक यांच्या विधानाची दखल घेतली आहे. त्यांना समन्स काढण्यात आले असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना आयोगासमोर येऊन त्यांनी केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.

परिचारक यांच्यावर आयोग कशाप्रकारे कारवाई करेल याबाबत अधिक माहिती देण्यास रहाटकर यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या, की आयोगाच्या कार्यकक्षेतच कायद्याची अंमलबजावणी केली जाईल. परिचारक यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच त्याविषयी अधिक वक्‍तव्य करता येऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: women commission warning to mla paricharak